Saturday, 15 December 2018

नाशिक भटकंती भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान

१२ नोव्हेंबर २०१८ ची सकाळ,  नेहमी प्रमाणे ऑफिसला गेलो होतो. दिवाळी नंतरचा पहिला आठवडा असल्याने बरेच लोक अजून सुट्टीवरच होते. पण जो भेटतोय तो आपण दिवाळीत काय केलं, कुठं फिरायला गेलो हे सांगत किंवा विचारात होता.  मला मात्र ह्या प्रशनोत्तरचा जाम कंटाळा येत होता. तसं बघितलं तर आपली दिवाळी काही वाईट गेली नव्हती. पण च्यायला आपला जन्म पुण्याचा, बायको पुण्यातली. जाऊन जाऊन गेलो तर फॅमिली सोबत आपल्या गावाला जे १०० कि.मी. वाई जवळ, त्यामुळे रोजच्या सिटी लाइफ मधून ब्रेक मिळाला आणि मस्त ३-४ दिवस मित्रांसोबत हुंदडत बसलोय असं बरेच दिवसात झालं नव्हतं. लग्न आणिपोरंबाळं झाल्यावर काही काळ फिरण्याचा बऱ्याच लोकांचा बँड-बाजा वाजतो तसा आमचाहि वाजलेला.  "जाने कहाँ गये वो दिन"...  

अशा विचारात असतानाचं माल्याचा(मालतेश कुसाळकर) कॉल आला. माल्या हा माझा डिप्लोमाचा मित्र. भेंडी कॉल करतो तेंव्हा ट्रेकसाठी इकडे गेलो होतो आणि असा मुक्काम झाला, हे खाल्लं ते केलं .. अशा गोष्टी सांगत नेहमी जखमेवर मीठ चोळत असतो. आणि "जाऊदे ह्याला ह्याच्या घरच्यांनी सोडलाय म्हणून फिरतोय उंडगत" असं मनातल्या मनात म्हणून मी स्वतःची समजूत काढत असतो.. असो पण या वेळी मात्र भाऊंचा सूर नाराजीचा होता.. आक्खी दुनिया दिवाळीत सुट्टीवर असताना आपल्याला सुट्टी मिळाली नाही, आपण शिफ्ट मध्ये काम केले आणि झोपेचं खोबरं झाला, कसली दिवाळी राव... हे ऐकून थोडा वेळ पण का होईना आमचे दुःख ह्याला कळले(वाट्याला आले) ह्याचा मला आनंद झाला. 

मी पण आता उगीचच "मग काय आता परत ट्रेक कधी असे?" समजूत काढायला दोन चार प्रश्न विचारले.. आणि "दिवाळीत ऑफिसला गेल्यामुळे मला पुढच्या आठवड्यात मोठी सुट्टी मिळू शकते, कुठेतरी ट्रेकला जायचं का?" असा प्रतिप्रश्न आला.. मग एखाद्याला आनंद आणि दुःख एकाच वेळी कसं होऊ शकतं याचा मला साक्षात अनुभव आला. त्याच्याशी बोलता बोलता मी आपलं मनातल्या मनात कॅलक्युलेशन  करत होतो, आता सध्या तरी काहि विशेष काम ऑफिसमधे नाही, लोकं अजून सुट्टीवरून येतायेत म्हणजे काही आपल्यावाचून कोणाचं काय अडेल असं पण नाही, आई बाबा घरी आहेत बायकोचं ऑफिस मुलीची शाळा चालू आहे म्हणजे आपण वीकडेमधे गेलो तर कोणाची तक्रार असायला कारण नाही..  परत कॉल करतो असे सांगून माल्या चा कॉल कट केला 

कॉल कट केल्यावर कधी नव्हे ते मॅनेजर ची आतुरतेने वाट बघत होतो तो आल्या आल्या त्याला सुट्टीबद्दल विचारले.. आणि लगेच होकारार्थी उत्तर मिळाले.. आणि मग काय भिडू "अपनी तो निकल पडी!", "मै फिक्र को धुए मे उडाता चला गया!" आणि तत्सम गाणी मला बॅकग्राऊंड मध्ये ऐकायला यायला लागली ...   लगेच माल्याला कॉल करून होकार कळवून टाकला.. मग व्हाट्सअँप वर "अजून कोण कोण येणार?" असा मेसेज आमच्या नेहमीच्या ग्रुप्स वर टाकून दिला.. आलेतर आले नाही तर दोघेच जाऊ अशा विचाराने... आणि संध्याकाळ पर्यंत मन्याचा कॉल आला.. माल्याला पण मी कॉन्फेरंसवर घेतला. मन्या (मनोज घुमटकर) हा आमच्या नेहमीच्या चमू मधला, सुशिक्षित पदवीधर. आपण सध्या नोकरीच्या शोधात आहोत, वडिलोपार्जित जागेत खेड मध्ये दुकानदारी थाटण्याच्या कामामध्ये आपण खूप व्यग्र आहोत असलं काही तरी बरळत होता. तरीअसली फुटकळ कारणे आम्ही काही ऐकून घेणार नव्हतो... "४-५ दिवसांनी काय फरक पडतोय मन्या चल, कॉंट्रीचं नंतर बघू!" असं म्हणल्यावर होय नाही म्हणत मन्या तयार झाला, छे आम्ही त्याला तयार केला :-)   


मी म्हणालो "भावांनो १३ तारखेनंतर आक्खे ३-४ दिवस मिळतायेत आपल्याला, एखाद्या डोंगर रांगेमधे घुसू आणि निवांत डोंगर दऱ्यांत हिंडत फिरू काय बोलता?", ह्यावर " चालतंय कि, पण जायचं कुठं" असं उत्तर आलं... मग थोडा विचार करत माल्याच म्हणाला "चला नाशिक पट्टयात जाऊ, माझ्या डोक्यात आहे एक रांग, रेकी झालीये ऑलरेडी...!", "एक नंबर!" आम्ही दोघांनीहि संमती दिली..

नाशिक जिल्हा नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि निसर्गरम्य किल्ल्यांनि सह्यवेड्यांचं लक्ष वेधून घेतो.. पण ह्या वेळी  नेहमीचे किल्ल्यांवर न भटकता आपण जरा "आऊट ऑफ रेंज" जाऊ असं आमचं ठरलं. मग त्याप्रमाणे  "अचला, अहिवंत , मोहनदरी(शिडका).. जमल्यास जवळपासचे  कांचना, सप्तशृंगी अशी भटकंती करू असा बेत ठरला... 

१३ तारखेला मी ऑफिस वरून हाल्फ डे टाकून दुपारी ३ वाजता मालतेश कडे सूस गावात पोचलो. ट्रेक साठी लागणारं सामान घेऊन दुपारी ४-५ च्या सुमारास आम्ही पुण्यातून निघालो. 

पाच दिवसात पायथ्याच्या गावांमध्ये काय मिळेल ह्याची पक्की माहिती नव्हती. त्यामुळे "किराणा थोडा जास्तच ठेऊ, बाकी काही जमलं नाही तर भात आणि आमटी तरी करू", असं नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण काही तरी खूप महत्वाचं आणि लोकांना माहित नसलेलं बोलतोय अशा स्वरमुद्रेत माल्या बोलायला लागला. मग त्या लाटेत तांदूळ, मसाले, भाज्या, दुधाचे टेट्रा पॅक्स, कोरडा खाऊ म्हणून गोळ्या, बिस्किटे. एनर्जी साठी ग्लुकोस बोल्ट. अंडी.. पाण्याच्या १ लिटरच्या १५-२० बाटल्या भरून. त्याच बरोबर एक-दोन पाच लिटरचा कॅन भरून सामानाच्या ताफ्यात सामील झाले. निवडलेल्यापैकी काही किल्ल्यांवर मुक्कामाची सुरक्षित सोय नसल्याने ४ माणसांचा एक टेन्टपण बरोबर घेतला"अरे येड्या एवढं पाणी कशाला?" असं आम्ही विचारल्यावर, "ऐनटायमाला पाणी मिळालं नाय तर काय किल्ला उतरून दमून खाली आल्यावर पाणी शोधतं बसायचं का त्यापेक्षा हे परवडलं. तुम्ही आणणार असाल तर ठेवा इथं मला काय प्रॉब्लेम नाही". असं, आपल्या शाब्दिक चातुर्याने आपण ह्यांना कसं सगळं घ्यायला लावलं अशा अविर्भावात माल्या म्हणाला.. आणि सगळं सामान तसही गाडीत राहणार आणि जेवढ लागेल तेवढं आपण गडावर नेणार हे माहित असल्याने आम्ही पण त्याला हरभऱ्याच्या झाडावर तसेच ठेऊन, जो हुकूम सरदार म्हणत गाडीत भरलं..   

 तसेच आपापली स्लीपिंग बॅग, एक मोठा आणि एक छोटा फ्लेक्स(झोपायला,बसायला... मल्टिपर्पज),  सह्याद्रीतील आपल्या saftey साठी आमच्या ग्रुप सोबत नेहमी असतो तो एक १०० फुटी रोप , screw gate,descender... हे सुद्धा ताफ्यात भरती केले... पुर्वानुभावातुन या गोष्टींची गरज कुठे कोणाला कशासाठी लागेल याचा काही नेम नाही आणि सर्वात महत्त्वाच अस की "Getting on Top is optional but getting down is mandatory for all..." म्हणून बऱ्याचदा Risk नकोच कसलीही म्हणून ते वापरतोच...
याच बरोबर घरी केलेल्या ८-१० भाकरी(जेवणबनवणे शक्य न झाल्यास कामी येतात) होतेच. सोबत फळे पण घ्यायची होती पण ती गडबडीत राहिली...   



गाडी मधे सामान भरून तयार 


आपण जणूकाही मायकल शूमाकरच्या गोत्रात जन्माला आलो आहोत याची प्रत्येक क्षणी जाणीव करून देणारं माल्याचं सुसाट ड्रायव्हींग आणि दुपारच्या वेळेस वामकुक्षीतून पूर्ण जागं न झालेलं पुण्याचं ट्राफिक यामुळे आम्ही अर्धा पाऊण तासातच नाशिक रोडला लागलो. चाकण सोडल्यानंतर भाम नदीजवळ नेहमीच्या 'भाम रिव्हर पोईंट' हॉटेल मधून मस्त कुरकुरीत सुकी भेळ पार्सल घेतली. आतापर्यंतच्या गडभटकंतीमध्ये अनेकदा भुकेची वेळ मरून न्यायला भेळी वरच खेळ करावा लागतो असा अनुभव आहे. आम्हाला ह्या वेळेसहि आला.. भाम मधून भेळ पार्सल घेतली. पुढे खेड मध्ये मनोजला उचलून आम्ही थेट नाशिक च्या दिशेने प्रस्थान केले. मन्याला घ्यायला गेलोय आणि मन्या तयार आहे असा योग बहुदा ब्रह्मदेवाने लिहिलेला नसावा. आपण सुरुवातीलाच शिव्या खाणार असं अशी लक्षण दिसताच मन्याने घरून आणलेल्या गरम गरम चीज सँडविच ने आमचे तोंड बंद केले.. आणि मग "इस बार इसे छोड देते है, सरदार हमने इस्का सँडविच खाया है" असे मनातल्या मनात म्हणत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 



खेडवरून प्रस्थान 


गाडीतून प्रवास करताना वाटेत इंटरनेट वरून किल्ल्याचे ब्लॉग वाचत, कुठे पाणी आहे, कुठे राहायचे आणि काय जेवण बनवायचे.. टेन्ट कोण घेणार अशी चर्चा करत आम्ही १० वाजेंच्या आसपास चंदनापुरी घाटात पोचलो. एव्हाना मन्याने दिलेले सँडविच खाऊन आम्हाला दोनच तास झाले होते... "एकदा नाशिक सोडले कि एवढ्या रात्री पुढं काय मिळणार नाही दादा..", मन्याचं तुणतुणं चालू झालं. मग घाटाच्या मधोमध असलेल्या एका हॉटेल वर माल्याने लगेच गाडी वळवली




चंदनापुरी घाटातील हॉटेल 



गाडीतून उतरल्याबरोबर थंडी वाजायला लागली आणि आपण जॅकेट नाही घेतलं याची मला जाणीव झाली. आणि "कशी बॅग भरतो रे, किती वर्ष ट्रेकिंग करतो".. असं म्हणून तसल्या गारठ्यात आपले हात जाकीटात घालत.. माझी टर उडवण्याची संधी त्या दोघांनी सोडली नाही. पुढे ट्रेकमध्ये जॅकेट्सचा जास्त उपयोग झाला नाही उलट वजन वाढले हा भाग वेगळा. त्या हॉटेलात दाल खिचडीवर ताव मारून आम्ही पुन्हा गाडी हाकायला सुरुवात केली. पुढे नाशिक, दिंडोरी,वनी  असा तीन साडेतीन तास प्रवास केल्यानंतर आम्ही अचला गडाच्या पायथ्याला असलेल्या दगड पिंपरी गावात पोचलो... 


पहाटेचे २ वाजले होते. सारं गाव, बाजूला असलेल्या किल्ल्याच्या नावाला साजेसं, 'अचल', गाढ झोपी गेलं होतं. मुक्कामासाठी ठरवलेल मारुती मंदिर, आम्हाला गावात प्रवेश केल्याकेल्या लगेचच सापडलं. आपली गाडी नजरेसमोर राहील असे बघून मंदिराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आम्ही गाडी लावून दिली. आता निद्रादेवी तिचं अधिराज्य आमच्या डोळ्यांवर गाजवण्यासाठी आतुर झाली होती. गाडीतून कसाबसा टेंट काढला. मग वारं लागणार नाही असा कोपरा बघून आम्ही मंदिरात तंबू उभारला.. मघाशी गाडीतून उतरल्यावर जेंव्हा सहजच मंदिरामागे नजर गेली तेंव्हा कुठल्यातरी डोंगर रांगेची सावली चंद्रप्रकाशात छान दिसत होती. तोच अचलागड असावा अशी चर्चा करत आम्ही पाठ टेकवली आणि कधी झोपी गेलो ते आम्हालाच कळलं नाही...

                                                                                                                                       
                                                                                                                                   क्रमश:

19 comments:

  1. किराणा थोडा जास्तच ठेऊ, बाकी काही जमलं तरी भात आणि आमटी तरी करू", असं नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण काही तरी खूप महत्वाचं आणि लोकांना माहित नसलेलं बोलतोय अशा स्वरमुद्रेत माल्या बोलायला लागला....
    Ekdam kadak re RaJa...

    ReplyDelete
  2. भारी राकेश!

    ReplyDelete
  3. वाचल्यावर मी पण ट्रेकला जाऊन आल्यासारखे वाटतेय...
    एकच नंबर....

    ReplyDelete
  4. Jabardast mitra!! Kadhitari amhalapan gheun ja barobar trekwar..😊

    ReplyDelete
  5. Excellent blog!!! लई भन्नाट!!! खूपच छान detailing...

    ReplyDelete
  6. मस्त रे रॉनी ...
    थोड उशीरा का होईना अलगद एक एक पुड्या उघडायला घेतल्यास ते...
    पुढच्या भटकंतीचा टाईम आला ना भाऊ आता :P :)

    ReplyDelete
    Replies
    1. ऐसेइच होना बावा ठीक से करना तो टाइम लगता :-)

      Delete
  7. राका मस्त मित्रा...

    ReplyDelete
  8. श्री गणेश झाला आहे आत्ता ह्या मध्ये अजिबात खंड नको मित्रा ।

    ReplyDelete
  9. सुंदर! पण तू जॅकेट विसरलास? ;)

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा अतुल तू पण:-) धन्यवाद...

      Delete
  10. धन्यवाद लवकरच.. टाकतो लिंक

    ReplyDelete