Thursday, 16 April 2020

नाशिक भटकंती भाग ४: किल्ले मोहनदर उर्फ शिडका

या आधीच्या भागाची लिंक इथे देत आहे : नाशिक भटकंती भाग ३: अहिवंतगड 
 १५  नोव्हेम्बर २०१८ चा दिवस तो.... 

दोस्तहो सर्वप्रथम नमस्कार... मी मालतेश... आमच्या 'सह्यात्री' टोळीतला एक सहयात्री म्हणून का होईना मित्रवर्य राकेश ने मला या एका blog च्या पानाची कमान आता माझ्या हाती दिलीय.. आत्ताच सांगता यायच नाय पण ही आमची भटकंती रॉनी च्या ईतर आधीच्या भागातील blog प्रमाणेच तुमच्या पुढ्यात टाकु शकेन का ते ज़रा  doubtfull च आहे....? याची ठळक कारणं अशी की एकतर माझ्या शाळेला माझ्यातुन सुटून आता जवळपास २० वर्षे होतील आणि त्यात मी कधी मराठी विषयाच्या निबंधाच्या पलीकडे अस कधी काही लिहिलच नाही... आणि दुसर म्हणजे आमची ही असली '#उनाड भटकंती' झाली ती नोव्हेंबर २०१८ च्या दिवाळीत आणि हा बाबा मला...... 'तू पण लिहायला घे' म्हणालाय ते गेल्या २०१९ च्या उन्हाळाच्या तोंडावर आणि मला तेच साठवलेलं आठवता आठवता आलाय हा आत्ताचा २०२० चा लॉक डाउन चा उन्हाळा   ....  कस काय करायच...  कस आठवायच नी काय काय लिवत/typing करत बसायच ते पण त्याच आमच्या ट्रेकवर... आणि त्यात आता त्यामागुन माझे कित्त्तीतरी ट्रेक उरकलेत सुद्धा ...!! अशी कयीक कारण देउनपण या राक्या च्या हेक्या पुढे माझं कधी चालत च नाय ना  ... ..  तर असो... कधीकाळी माझ्या सुचलेल्या ओळीतलेच... "लिहिणे आता भाग आहे.......  आणि निरंतर चालणेही आता भाग आहे..."अशे काहीसे शब्द होते तेच डोळ्यापुढे आठवले   ...  Olympic मधल्या एखाद्या थकलेल्या खेळाडुने दुसर्या आपल्या साथीदाराच्या हाती जशी धगधगत्या मशालीची धुरा सोपवावी ना .....  एकदम आता तसच वाटतय..... तितक्याच जबाबदारीवर हा दिलेला धनुष्य उचलून हा भाग मांडण्याचा माझासुद्धा हा एकुलता एक प्रयत्न.....  आपण दोस्तानीं संभाळून... समजुन घ्याव...नि प्रतिकिया नक्की द्यावी हीच एक विनंती वजा इच्छा !!


अहिवंत गडावरून आता साधारणपणे सकाळी १०.३० - ११  च्या सुमारास खिंडीतून उतरून आमचा मोर्चा मोहनदरी या गावाकडे कडे वळवायचा होता ...एव्हाना आम्ही खाल्लेल्या अंडा सॅन्डविचच्या भत्त्याचा पत्ता उन्हाच्या तडाख्यातच गायब होत चाललेला...
आजच्या आज मोहनदर किल्ला उरकून घेतला तर मला माझा पुढचा प्लान मांडायला बर पडणार होत.... मुळात माझ्याकड तसा प्लान तसा शिल्लक नव्हता पण तरी पण मनात मात्र "घर से ईत्ती दूर ट्रेक के लिये ही आयेछ है तो कहीं न कहीं चढ के जायेंगेच् ना " मनातली ती नुसतीच खाजेची बड़बड़..... पण आजचा दिवस लवकर संपवून उद्याच काय ते पन बघायच होत याच्यातच गड उतरत होतो.....






हायवेला आता सप्तशृंगी चा गड़ उजव्या बाजुला तर डाव्या बाजूने अर्ध वर्तुळाकार अशी ऊभी कातळभिंत असा दुरवर पसरलेला आणि त्यात त्या भिंतीला पडलेल ते सुंदर भगदाड !! खरतर कित्येक दिवसांपासून माझ्या लिस्ट मधल्या लक्षात ठेवला गेलेला तो मोहनदर ऊर्फ शिडका किल्ला !.. शिडका हे नाव तरी कस पडल असेल ते माहीत नाही पण पायथ्याशी असलेल्या 'मोहनदरी' गावामुळे 'मोहनदर' हे नाव एक नक्की असाव हे निश्चितच....
अहिवंतगडाच्या दरेगावातून एका शार्टकट ने जेमतेम ६-८  की.मी. आणि सप्तश्रृंगीगड़ा पासून १३ की.मी. अंतरावरचा तर हा मोहनदर किल्ला ....  आम्ही उतरलेल्या अहिवंतगडाच्या खिंडीतून जो समोरचा एक डोंगर दिसत होता त्याच्या पलिकड़ेलाच तर मोहनदर लपलेला होता (तिथुनच खरंतर एखादी वाट नक्कीच असावी).


गाडी चालवताना माझ्या डोक्यात आता परत सगळी गणितं चालु झालेली.... आपल्या कड़ शिल्लक किराणा किती...., कोरडा खाऊ काय राहिलाय ? (आणि महत्वाच म्हणजे आमची ऊर्जा अजुन किती... ? ) दुपारच कुठे ...  कस भागवायचं ... ? मोहनदर वर मुक्काम तर आजचा करायचा नाय......  नाहीतर मग माझ्या पुढच्या  लिस्टला नीट हात घालताच नसता आला .. मग म्हणून नुस्तच पिट्टु बॅगा घेऊन हा किल्ला उडवून यायचय म्हणजे वझ्याला कहार सोबत नसणार... आधीचा केलेला अभ्यास म्हणजे थोडफार महत्वाच 'शेफ्टी गियर' लागणारच ... कारण त्या तिथल्या त्या नेढ्यात म्हणजे भगदाडात चढायला 'दोर बीर descender स्क्रूगेट' असल जरा हार्डवेअर साहित्य लागणार .... उगाच त्या शिवाय फुकाट आपण आपलाच तमाशा करुन घ्यायला नको उगाच  ... असल्या विचारांची गोळाबेरीज चालु असतांना ईतक्यात जाताना हायवेला रस्त्यावर मन्याला काही हॉटेलची रांग दिस्ताच म्हणाला "दादा , मी काय म्हणतो जरा थोड फार खाल्ल अस्त ना आपण लगेच किल्ला चढून उतरलो असतो" मी पण आप्ली मंडळाची गणित जास्ती बिघ्डायला नको म्हणून त्याच्याकड़े वाकड्या तोंडाने बघत फक्त 'बर' म्हणालो. 





११.३०  होत चाललेत आणि उन तापयला चालु झालेल ... गाडीने रस्त्याच्या बाजुने असणारी काही शेत ओलांडत जाताना 'रात्रीच्या मुक्कामच' काय हे कोड डोक्यातच सोडवत असतानाच एक शेत जमीनीला लागून असलेला छोटा डॅम नजरेस पडला.. आणि मग काय "सोय झाली भावा" अस अचानकच ओरडलो आणि गाडी लगेच बाजूला दाबली...  मन्याला त्याच्या पडलेल्या भूकेपायी गाडीतच बसवला आणि राक्याला म्हटलो "चल रे जरा टोपी घालून..." एका हॉटेलच्या मागन दोन - चार शेताची बांध पाल्थे घालत ५ - १० मिनिट पुढे गेल्यावर डॅमच्या पाण्याच्या कडेला लागुनच नुकत्च नांगरणी केलेली मोकळी शेतजमीन आणि त्या पाण्यात आपल प्रतिबिंब उमटवत उभा ठाकलेला समोरच असलेला तो लांबसडक पट्ट्याचा तो मोहनदर किल्ला आणि त्याच्या डाव्या बाजुस एक डोंगर सोडून आमची पाण्यासाठी वणवण केलेल्या कालच्या अहिवंतगडाचा भाग पन दिसत होता... आणि तीच ती खिंड असावी...

मी म्हणालो "ए रॉनी  ... आज जर आपली दुसरीकड कुठ नीट सोय नाही झाली तर हीच आजची आपली मुक्कामाची आणि ह्या ट्रेकवर किमान उद्यातरी आंगभरून आंघोळ होण्यासाठी ही बेश्ट जागा...."  माझ् बोलन व्हायच्या आधीच राकेश बोलला "आयला भावडया म्हण्जे एक शाम लेक्साईड टेंट मे कॅंपिंग असल तर अपनेको चिकान का बेत होना रे........ "
मी पण आपल "हौ रे भाऊ.... हौ ...." अस म्हणत आम्ही दोघेपण हसत गाडी कडे गेलो नि मन्याला बनलेला पिलान सांगितला तर त्याला त्याच्या सध्याच्या भुकेपुढ त्याला काहीच न ऐकून घेता मोबाइल मधून तोंड काढून आम्हाला नूस्त बोल्ला की "रात्रीच रात्रीलाच बघु यार पण आता काहीतरी खायला चला..."  त्याच तोंड बघून मला हैद्राबादी बिर्यानी पिक्चर मधल्या त्या मिशिवाल्या 'किरात' च्या एका डायलॉगची आठवण आली अन तो जसा पोटावर हात फिरवत इस्माईल भाईला "पूरा फिरा के आये उस्ताद, ये चौड़े चौड़े गल्ल्या... वो बड़े बड़े गल्ल्या....  उस्ताद, भूक लग री उस्ताद...भूक लग री.. कुछ तो खिलादो यारो." मन्याच्या तोंडावर त्या 'किरात'ची दूसरी कॉपीच लटकली ... आम्ही दोघांनी फक्त माना हलवल्या आणि मी गाडीला स्टार्टर मारला.


रस्त्यावर 'नांदूरी' या तालुक्याच्या गावातुन मोहनदरी कड़े जाणाऱ्या फाट्याला एका हॉटेलला थांबलो.... या फाट्याच्या जवळच मारुती मंदिराच्या कट्ट्यावर एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली काहीशा वीरगळी नजरेस पडल्या.... युद्धात धारातीर्थ पडणाऱ्या वीरांच्या स्मृतीसाठी कोरल्या जाणाऱ्या दगडी स्तंभ म्हणजे वीरगळ.

आम्ही सप्तशृंगीगडाच्या जवळच हायवेवर असल्याने तिथही देवीभक्तांची अशी ज़रा जास्तीची वर्द्ळ दिसत होती... धार्मिक ठिकाण असल्याने मला तर काही खायला 'चांगल' मिळेल या बाबत शंका वाटल्याने मन्याला जे काही खायचे ते टेष्ट करुनच आम्ही दोघांनी नंतर तसच मागवल... आम्ही १ - १ मिसळ पाव आणि सकाळपासून मिस झालेला चहा मारुन थेट मोहनदरी किल्ल्याकडे रवाना झालो  ... आता १ वाजायला लागलाय .... वाढत उन चांगलीच किक देणार हे नक्की असल्याने १ किलोबर काकड्या आणि चाट मसाला सोबत ठेवलेल्याच होत्या ...

मोहनदर किल्ल्याच नेढ कित्तीतरी लांबुन पण आमच लक्ष वढुन घेत होत...
खरतर अशी नेढ म्हणजे सह्याद्रीच्या कातळाची निर्मीती होतांना काही ठीसुळ भागही तयार झालेले अन पुढे चालून काळाच्या ओघात उन-वारा-पाऊस सोसत अशा भागांची पड़झड़- झीज होत गेली आणि कातळकडयाला आरपार झालेली ती भोक च होय.. मोहनदर च्या पायथ्याशी गावात त्या दुमजली आश्रमशाळेच्या इमारतीजवळ पोहोचलो... आणि पुढची चौकशी चालु केली ती आम्हाला हटकलेल्या तिथल्या त्या शिपायासोबतच .....



गडावर जाणार्या सगळ्या वाटा ह्याच आश्रमशाळेपासून जातात एवढीच माहीती होती पण आम्ही त्यातील कोणती वाट निवडायची ते आम्ही आमच्याकडे नेहमी प्रमाणे वेळ जास्ती नसल्याने डायरेक्ट नेढ्याच्या जवळ्ची पण ज़रा जास्त चढणाची वाट निवडली... थोडाफार कोरडा खाऊ, काकडी, एनर्जल पावडर आणि २- २ पाण्याच्या बाटल्या आणि safety  साठीच रोप...ईतर जे काही तिथ लागणारच अस हार्डवेअर साहित्य ब्यागात घेउन भर दुपारच्या दीड २ च्या उन्हात आमच आम्हीच चढायला सुरवात केली...  आजपण ईथ सोबत वाटाड्या वाट दाखवायला कुणीच तयार नव्हत यायला... बदनसीबी हो आजपण आमची ( ईथच तर धोक्याची घंटा वाजली पण ऐकू कोणाला येणार... सब गोलमाल है भाई सब गोलमाल ..... नाय आलं हो ऐकू ... )  ..... असो ... शोधु आपली वाट आपणच पुढे अस म्हणत आम्ही आमचा गाडा त्या तापलेल्या झळाळीत..  वरच्या सांगितलेल्या दिशेन हाकायला सुरवात केली...

वर जस जस जाऊ तस तस आता खालच्या पट्ट्यातली दाट हिरवी झाडी संपली आणि गारवा पुरवणारी सावली पण गेली... खरतर उन्हाच्या वेळी मला चढ़ाई नको होती पण लय मुंगळे आमच्यात....  घ्या अजुन असा सुनवत सूर्य पन अजुन तळपत होता..... उन्हात मला आजुन अस किती करपून सोडणार... बालपणापासूनच माझ्यावर तसा अंधार पडलेला त्यात आता हा उरलेला दिवस संपुन आंधार पडायच्या आत खाली यायच टार्गेट म्हणून आता फक्त मोहनदर च्या त्या नेढ्यावर घुसायच वेध लागलेल....
भराभर चढ़न्याच्या हेक्यात दुपारच्या उन्हात आता अंगातुन निघणाऱ्या घामासोबत आमच्या छातीतून शीट्ट्या वाजायला लागल्या....  चढता चढता पाण्याचे ब्रेक घेत मी मन्या ला आणि राक्या ला या नेढ्या बाबतीतची तिथली लोकल आख्यायिका सांगु लागलो ...

"सप्तशृंगी देवी जेव्हा महीषासुर राक्षसाचा वध करण्यास खाली अवतरलेली तेव्हा भयभीत झालेला राक्षस ईतक्या वेगाने आकाशाला भिडायला गेला की जाताना या किल्ल्याच्या भिंतीच्या दगडातून आर पार गेला तेव्हा पासून हे अस भगदाड़ म्हणजे 'नेढ' तयार झालेलं.....  आणि काही कुणी अस मानतात की त्या कातळभिंतच्या पलीकड महिषासुर लपलेला मग देवीनेच लाथ मारुन तयार झालेल्या खिडकीतून त्याला ओढून काढला... अस अजुन काय च्या कई...... "
मी पण तिथच ऐकलेल्या वाचलेल्या त्या दंतकथा बाता काही त्या दोघांच्या पचनी पडल्याच नाही अस वाटल , तोच वर नेढ्याकडे पाहील तर आमची वाट जरा जास्तीच चुकल्यासारखी वाटली कारण आम्ही आता संपूर्ण किल्याच्या डाव्या बाजुच्या पश्चिम टोकाच्या दिशेकडे आलेलो तर ते नेढ राहीलेल मधल्या पट्ट्यात वरच्या बाजुला....च्यायला ईतकी मळलेली वाट जशी सांगितली तशी फॉलो करत निघालेलो तरी पण अस कस होतय ??... मग नेहमीप्रमाणे आमचा 'हुडक्या' मन्या ला पाठीमागे परत पाठवून आपला कुठला टर्न चुकला बिकला की कायते बघायला हाकलला....

खरतर कालच्या किल्ल्याच्या झालेल्या फरफेटेमूळ आमच सगळ्यांचच चालताना वाटेकड लक्ष होत पण साला घोळ कुठ होतोय ते कळाना .... त्या आश्रमा पासुन सरळ अशी तिरकी वाट ही नेढ्यापर्यंत जात होती हे ही त्या शिपायाने त्याच्या काठीने दाखवल असताना आता पुन्हा आता आजपण आमची जाम वाट लागणार की काय ... अस वाटायला लागल... आमच्या आत्ता च्या लोकेशननुसार मधल्या भागात नेढ्याच्या जवळ जायला काही ठिकाणी अवघड असा कातळ टप्प्यांचा ओवरहॅंग आमच्या बाजूने सरळसरळ दिसत होता आणी त्यात गचपान पण माजलेल होत म्हणून क्लाईंब हार्डच होता हेपण नक्की... स्पोर्टी मन्या आता कसा बसा अतोटी कसोटी करत माकड़उड़या मारत वर वर नेढ्याच्या दिशेन वर वर घुसताना दिस्ला... राक्या कड़ बघितल तर त्यानी पन माझ्या न विचारलेल्या प्रश्नाला नुस्तच वाकून मानेनी नाई नाई नाय ... अस हलवत डोळे चोळत माझ्याकड़ बघत र्हायला.... मग मन्याला मुद्दाम परत आमच्या कड माघारी बोलावला आणि आहे तीच बोड़की वाट फॉलो करून जाऊ..  मग लांबुन का होईना ह्या वाटेने डाव्या टोकाकडून नेढ्यावर नेईल अस वाटवुन घेतल...  अन त्यात अंधार पडण्याच टेंशन तर होतच की म्हणून मग आजतरी निवडलेल्या मुक्कामाला उजेडातच पोहोचायच असा ठरल होतच ..... जरा आज नॉन व्हेज बेतातल सुस्तीतल relaxation ठरवलेल...  दुसर काय ....

डाव्या बाजूने अजुन वर चढ़त राहीलो .... आम्ही आता बरोबर किल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोहोचलो  तसा एका छोट्या खिंडीतून डोक वर काढताच गड माथ्यावर आमचा प्रवेश झाला खर.. पण नेढ्यात जायला ती वाट नव्ह्तीच मुळी हे पुढ सरकल्या शिवाय का ते आम्हाला कळणार होत ...  सुर्य तसाही अजुन चिक्कार सोबतीला होताच कारण ४ ची तर फक्त वेळ झालेली असल ... 
वरच्या माथ्यावरून आता समोर एका बाजुला दरीतून डायरेक्ट ढगात घुसू पाहणारे सप्तशृंगी गड , मार्कण्ड्या ,जावळ्या , रवळ्या , धोडपगड, कन्हेरगड , इखारा, कांचना असा नाशकातल्या सातमाळ डोंगररांगेतील एकापेक्षा एक वरचढ सुंदर दुर्ग ते ....  आम्ही मागच्या वर्षी याच किल्ल्यांची ( कन्हेरगड कांचना वेळेअभावी सुटलेले ) पायपीट केलेली हीच गड डोंगररांग रांग उठून दिसत होती...

तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण खालपर्यंत जंगल आणि मग त्या पलीकडे हिरवीगार शेतं.... चणकापूर धरण , चिंचोरी गाव परिसर नजरेत भरत होतं!

खरंतर मोहनदर किल्ल्याचे सारे अवशेष हे त्या नेढ्याच्या उज्व्या  बाजुस वरच्या माथ्यावर आहेत अशी माहीती घेतलेली होती आणि आम्ही अजुनही डाव्या भागातल्या पश्चिम टोकाच्या माथ्यावर जिथ ते मोकळ पठार होत तिथेच  होतो...  आता तिघांनी नेढ्याच्या दिशेने चालायला सुरवात केली.... वाट आता अरुंद आणि निमुळती होत चाललेली... वरतुन उजव्या बाजूला मोहनदरी गाव आणि आश्रमशाळेची ती ईमारत स्पष्ट दिसत होती... माझ्या समोरुन मन्या भराभरा पावल टाकीत पुढे गेला आणि नेढ्याच्या जवळच अगदी वर जाऊन एके ठिकाणी थबकला... त्या ठिकाणापासून वरतूनच त्या कातळभिंतीच्या रांगेतल्या बऱ्याचशा दगडांची पडझड झालेली दिसत होती आणि आता आमच्या दोन्ही बाजुला खोल दरी.... आ वासुन ठाकलेली ती ...

मन्या बोलला पुढे जायचय का ? पण आम्ही दोघांनी ठळक पणे 'नाही' म्हणून मान हलवली कारण धोका असा शिवुन गेला की कदाचित आता त्या ठिसूळ झालेल्या दगडावरून खाली Descend  करत जाण्याच्या प्रयत्नात त्या नेढ्याच्या वरची शिल्लक राहिलेली दगड पण ढासळली तर !! छे... भाऊ सर सलामत तो किल्ले पचास.....  त्यापेक्षा आता 'दिल्या घरी सुखी रहा आणि गेल्या जागी समाधानी व्हा...'.  आमच्या कडचा दोर साधारण १५० फुट भर.... पण खाली उतरायला किमान २५० फुट तरी पायजेल होता मग तसा कायतरी rappeling चा विचार केलाच असता.... 
ईथ समोर ईतका डायरेक्ट drop होता की आपण जिथे आपटणार ती जागा पण नीट दिसत नव्ह्ती ...  मी माझ्या गड-किल्ल्यांच्या भटकंतीत अशा प्रकारच्या या स्पॉटवर म्हणजे एका ईतक्या भल्या मोठ्या नैसर्गिक तयार झालेल्या भगदाडा च्यावर एकदा जुन्नारजवळच्या 'हटकेश्वर' ट्रेक ला गेलेलो आठवल ...  त्या किल्ल्याच्या अर्धगोलाकार C टाईप  उंचा भिंतीच्या मध्यावरील अरुंद स्पॉट वरुन चारी बाजुला दिसणारा तो नजारा ... जाम भारीवाल फीलिंग येत होत तिथ ....
आम्हाला आता त्या दिवशी माझ्या भटकंतीतल्या कुठेतरी वाचलेल्या आणि अतिपरिचित नसलेल्या किल्ल्यांमधल्या आणखी एका स्वप्नाची पुर्ती करणारी अशी ती विलक्षण अनुभुती पदरी येत होती .... आणि मी तसा स्तब्ध होउ लागलो.... तिथला थरार..... त्या नेढ्याची खरी भव्यतेचा अंदाज आता येऊ लागलेला  .....  आम्ही तिघे पण तिथेच त्या नेढ्यावरच्या काळ्या खडकावर बसलो अन घशाची पडलेली कोरड विझवण्यासाठी पाण्याऐवजी तिखट-मीठ लावून काकडी ब्रेक मारायचा मंडळाचा निर्णय ...

पुढे तर जायची रिस्क न घेता त्या ठिकाणी थोड़ वर सरकुन त्या तिरकस दगडाच्या सपाटीवर थोडी पाठ टेकवायच्या माझ्या विचारास आता मी सुद्धा फाटा देउ शकत नव्हतो...
आमच्या खाली असलेल्या अवाढव्य खिडकीसारख्या त्या नेढ्यातुन ईतका असंख्य वारा घुसून बाहेरून दुसऱ्या बाजुला निघतानाचा एक विशिष्ट असा आवाज कानात सतत उमटून आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच पोकळीत नेउन सोडत होता...   तिथला SsSs घोंगता वारा,,,,,त्या स्पॉट चा थरार अनुभवत आणि निळ्याशार आकाशात उमटलेल्या काही विमानाच्या धुरांच्या रेषेकडे बघत आम्ही तिघे निपचीत पडलेलो असताना आमची सगळी झालेली उन्हातली वणवण नि अंगात भिणलेला थकवा आता आमच्यातुन गायब होत खडकात विरत चाललेला होता ... दुसऱ्या बाजूला ढगातल्या दिनकराने सुध्दा एकीकडे झुकता कल घेऊन आमच्या वरची बिंबवलेली नजर हटवून आजचा कारभार आटोपून अस्ताला निघायच्या तयारीत होता .....

२५ - ३० मिनिटे निवांत पडलो असल नेहमीप्रमाणे.. मग नंतर उठून मोहनदर किल्ल्याच्या त्या अर्ध्या चंद्रकोरी सारख्या कातळभिंतीच, मग कुठे  त्या अवाढव्य खिडकीतुन पलीकड उमटणार्या सांजेच्या कवडशाच... आजूबाजूचा सातमाळ डोंगररांग - धरण - गड - शेत अस जे जमेल ते आमच्या फोटोंच्या चौकटीत आमच्यासह बद्ध करुन निघायच ठरवल... कारण आजतरी आम्हाला उजेडातच मुक्कामाच्या जागी पोहोचून नॉनवेज चा बेत उरकायचा होता.....




म्हणून मग आता गड़ उतरायला जास्ती वेळ लागणार नव्हताच ना .... .भराभर गड उतरायला घेतला आणि आल्या पावलांनी खिंडीतली घसरडी वाट पकडून वळणवळण घेत अंधाराने आम्हाला गाठायच्या आधी धापा टाकायला चालु केली....... लवकरच आश्रम शाळेजवळ पोहोचलो एकदाच..... थोड़ा क्रीम रोल भत्ता मारला मग
पटापट ब्यागा डिकित कोम्बल्या आणि गाडीतून परत नांदरी रोडला रवाना .. ....

नांदुरी फाट्यावरच्या अनेक चिकन दुकानांमधल्या रांगा पाहुन राका ने हेरलेल्या एका शॉप मधुन चिकन पॅक करुन त्या छोट्या धरणाकडचा रस्ता पकडला तोवर अंधार झालेलाच थोडाफार आणि मग तिथंच एका हॉटेल मालकाशी बातचीत करून तिथेच गाडी लावुन आमची पलटन camping च सार सामान पाठीवर लादुन शेताच्या बाजुची ठरलेली वाट उपसत... जमेल ती पडलेली लाकड गोळा करत... निवडलेल्या जागेची नीट पाहणी करुन टेंट मारला एकदाचा, अन बॅगा टाकल्या आत.
मी चुल मांडुन पेटवायच घेतल तोच राका बोलला आज झणझणीत बनवायच राव ... मी म्हणालो थोडा वेळ लागेल बनायला पण मस्त लसलशित अशी एक बंगाली चिकन रेसिपी माहितीये मला तस करु मग आज  ...  चला आता आजचीपण शेफगिरी माझ्याकड आल्यावर थोडेफार हुकुमशाहीची मजा घेऊन ताट- भांडी पातेली धुवून घेतली दोघांकडून...

बेत तर आमचा झगासच होताच आणि आता कालच्या पेक्षा आजच्या झालेल्या दमणुकीचा... गडाचा.. पायथ्याच्या गावाचा... त्या आश्रमशाळेचा.. अशावर चर्चासत्र होउ घातले... वाढत्या  थंडी बरोबर चुलीच्या धगाजवळची ती उब आता आम्हाला अजुन घट्टपणे तीच्यासोबत बांधु लागलेली आणि त्यात आमच्या त्या बंगाली चिकन चा सुटलेला सुवास सगळीकडं दरवळू लागलेला ...

मन्या बोलला दादा आता जाम भुक लागलीये झालय का बग की झालाय का ते  ... राक्या बोलला 'सब्रर  का  फल  मीठा  होना  रे ...'  आमच्या समोरच त्या मोहनदर किल्ल्याचा सबंध कातळकडा दुरवर पसरलेला दिसत होताच आणि त्याही अंधारात आमच्या गप्पा टप्पांसोबत ... निळ्याशार पाण्यात .. चांदण्याच्या प्रकाशात ..  आम्ही ते मोहनदारीच नेढ शोधु लागलेलो ... 

मस्त पैकी तिघांनी चिकन-भात आणि राहिलेली घरची भाकरी रश्साबरोबर कुसकरेली हादडताना घरची आठवण काढत संपवल..  "लयी म्हणजे लयी भारी झालेलय राव चिकन ... माझ्या फार मोजक्याच ट्रेकवर ईतक स्वादिष्ट जेवलोय ... - ईति राक्या...  पोटावर हात फिरवत "अन्न दाता सुखीभव" आणि असलच काहितरी बरळत हे दोघे पण थोडाफार फेरेफटका मारून टेंटमध्ये शिरले... नॉनव्हेज जेवणामुळ मग टेंट बाहेर येउन सगळी ईतर खातरजमाकरुनच मी स्वतः झोपायला घेतल... 
धरणाच्या पाण्यावरची हवा आता चांगलीच थंडावली होती...  आम्हाला ती हवा जेवण जास्ती झाल्याने जास्तीच गारगार जाणवत होत ...
मी विचारात पडलेलो की अजुन २ दिवस शिल्लक आहेत आता अजुन कुठ कुठ भटकायच ... ?
आम्ही अजूनही सप्तश्रुंगी परिसरात असल्याने माझ्या स्मरणपोटलीत 'बागलाण प्रांत' होताच आणि  तिथल्या भागातली अप्रतिम अशी काही दुर्गरत्न अनुभवायचीच यंदा तरी असा किडा सुरु होताच कारण असं की बागलाणातला एका ही किल्ल्यावर कधी फिरकलेलो नव्हतो आणि त्यात परत परत कोण कशाला इकडं तरफडणारं ...? 





परत मोबाईल मध्ये मी maps मध्ये आमच्या  लोकेशन च्या जवळपासच सगळ धुंडाळत बसलो थोडावेळ... मग म्ह्टल ... बघु उद्याच उद्या .... आजचा तर दिवस मस्त गेलाय म्हणून सुखावलो तोच राक्या कड एक नजर पडताच तो माझ्याकडच बघत होता.... तो डोळे वटारुन नुस्ता म्हणाला .... "त्या मोबाईल ची स्क्रीनलाईट बंद करुन गप झोपतोस का आता ?" मी तसाच चुपचाप स्लीपिंग बॅग मध्ये डोक दडवुन घुसून झोपी गेलो ....  पण उद्याचा विचार पक्का .. माझा एकट्याचाच त्यावर शिक्का....  की आपण एकदाही न भटकलेल्या त्या  'बागलाण प्रांतावर' थोडीतरी घुसखोरी करायचीच उद्याला ....


क्रमशः  

(क्रमश: मध्ये उद्याचा किल्ला आमच्या सगळ्यांच्या संबंध ट्रेकलाईफ मध्ये फार फार भन्नाट फोटोग्राफी देऊन गेला ... पन आमच्यात दोघांच्यात अजून पक्क नाही की  पुढचा  blog मी लिहिणार की राका  ?...  बघूयात छापाकाटा काय बोलतो ते   :प )



या आधीच्या भागाची लिंक इथे देत आहे : नाशिक भटकंती भाग ३: अहिवंतगड 


तुमच्या प्रतिकिया /सूचना जरूर कळवा  ..

Saturday, 22 June 2019

मी, अवनि आणि सिंहगड...

शनिवार ८ जून, २०१९
                                                                                                                           

इयर एन्ड ट्रेक नंतर एक पण ट्रेक झाला नाही, शुक्रवारी संध्याकाळी सहज मनात विचार आला, पाऊस चालू व्हायच्या आत सिंहगडाला तरी जाऊन येऊ. आधी एकटच जायचा प्लॅन होता पण सहज अवनिची मजा करावी म्हणून तिला विचारलं "येणार का ट्रेकिंगला, आई नाही येणार मी एकटाच जाणार आहे?".  

"मी येणारे बाबा, पन...  तिथं किडे आणि साप असतात...".  सुरुवातिलाच असा प्रश्न विचारल्यावर मला वाटलं होतं आता हि कल्टी मारणार, एकटं जावं... "अवनि, मी आहे आपन जाऊ बरोबर, मी हात धरतो तुझा"... आणि मग थोडा विचार करून म्हणाली ठीके बाबा जाऊ... मला हे अपेक्षित नव्हतं आणि सकाळी उठून काय होतंय ते पन सांगता येणार नव्हतं.. तरी पण त्यातल्या त्यात समाधान... 

एरवी झोपण्याआधी टाइम पास बडबड करणारे आम्ही.. सकाळी कधी उठायचं आणि काय कपडे, शूज, ... खायला काय... वगैरे वगैरे चर्चा करत झोपी गेलो... 

ठरल्याप्रमाणे ६ वाजता कोणीच उठलो नाही... मला वाटलं आता प्लॅन गंडणार.. आपण आपलं निघावं.. मी आवरून घेतलं.. बायकोला बहुतेक अंदाज असावा कारण अवनि तशी तिला सोडून कुठं जात नाही.. त्यामुळं ती निवांत होती.. 

पण थोड्याच वेळात अवनि मॅडम उठल्या आणि तयारीला लागल्या... मी मनातल्या मनात म्हणालो " आहे वाटतं अजून डोक्यात हिच्या".  पटापट बॅग भरली आणि दोघं पन तयार झालो. बायकोच्या चेहऱ्यावर आता आपल्याला निवांत राहता येणार ह्याचा आनंद आणि हे दोघं कसे करणार ट्रेक याची काळजी असले दोन्ही भाव मला दिसायला लागले... त्यात कुठली भावना जास्त स्ट्रॉंग होती माहित नाही पण त्यात सतराशे साठ सूचना दिल्या गेल्या आणि "हो...ओSSS ..."  म्हणून आम्ही दोघं घरातून बाहेर पडलो... साधारण ८ वाजले होते .. 

कात्रज वरून सिंहगड तास लांब नाही पण जसा उशीर होणार तसं ऊन वाढणार त्यामुळं निघाल्यानंतर कुठं काही थांबलो नाही...  ड्रायविंग सीटच्या बाजूची सीट पूर्ण रिक्लाईन करून निवांत राहिलेली झोप पूर्ण करत अवनि अधूनमधून पोचलो का बाबा विचारत होती.. मधेच एकदा खडकवासल्याच्या धरणाचं पानी बघून पाण्यात जायचंय म्हणून मागं लागली.. येताना जाऊ सांगून... कसं बसं निघालो पुढं... 

गडाच्या पायथ्याला पोचलो ९ वाजता. जसा एसी मधून बाहेर पडलो उन्हाचा तडाका बेक्कार जाणवायला लागला. आता अशा उन्हात हि कशी तग धरणार असं मला वाटायला लागलं... म्हणून अवनि करायचा का ट्रेक चालू म्हणालो आणि "बाबा मी कधीच रेडीये, तुम्ही शूज घाला कि...", एकंदरीत उत्साह अजून कायम आहे याची मला जाणीव झाली.. चला मग मी पटापट शूज घालून निघालो... 



शनिवार असल्यानं येनारी जानारी लोकं बऱ्यापैकी होती.. सुरुवातीचा तसा सपाट रस्ता बघून, "बाबा किल्ला कुठंय ", मग पुढं एका वळणावर तिला गड दाखवला.. पुणे दरवाजाच्या बाजूनी बसवलेली रेलिंग दिसत होती.. पुढं निघालो..  मोठा दगड दिसला कि त्याच्यावरूनच जायचं.. घसरतंय असं दिसलं कि बाबा भीती वाटतीये .. असं म्हणत आम्ही पहिल्या टप्प्यात आलो... त्याच्या पुढं "बाबा असा कसा ओ ट्रेक.. मी तर पळू पन शकते एवढा कमी चढ कसा काय असतो किल्ल्याला"...  "वरती बघ कि...अवनि.. ", "हा.."



असं म्हणत पहिला टप्पा आला... मला अंदाज नव्हता हिला किती दम लागलाय किंवा तहान लागली, तरी एक पाणी ब्रेक घेतला.. थोडं पुढं गेलो तर एक कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रुप दमून बसला होता... पुढं लगेच चढ होता.  मला वाटलं जरा दम खावा तर अवनि म्हणाली "कुठंय मोठा चढ?" मग निघालो पुढं... तिची तशी कंमेंट ऐकून ती कॉलेजची पोरं पन हसून उठायला लागली.. आम्ही एक एक टेकड चढत तर कधी साधा रस्ता पकडत पुढं निघालो... लांबून एक दुकानाचं शेड दिसत होतो तिथं गेल्यावर थांबू असं आम्ही ठरवलं...



शेड जवळ आलो आता घशाला कोरड पडली होती.. मस्त सावलीची जागा होती.. अवनि म्हणाली बाबा संत्री काढा.. मग मस्त रसरशीत संत्री आम्ही दोघांनी संपवली.. उन्हाचा पारा चांगलाच चढला होता.. तरी अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक हायसं करत होती... माझा जरा जास्त थांबायचा विचार होता.. तर अवनि म्हणाली "बाबा सगळे जातील आपल्या पुढं..चला लवकर..." मला हसू येत होतं पन मी निघालो... 


अजून एक टप्पा पुढं गेल्यावर एक पठार लागलं. तिथून किती वर आलो त्याचा अंदाज येत होता. पलीकडे दरी होती तिथं जाऊन आम्ही "बाबा डोंगर कशाचा बनतो", पासून "तिकडं डोंगरात मगरी सारखा काही तरी दिसतंय





"अशा भूगोलापासून जीवशास्त्रापर्यंत गप्पा हाणून पुढं निघालो..." मधेच वरची रेलिंग नाही तो रेल्वे ट्रॅक आहे असं मला समाजवण्यात आलं आणि मान्य करून आम्ही पुढं निघालो.. मधेच रस्त्यात लांब एखादा पक्षी दिसायचा आणि बाबा पक्षी असं दाखवून त्या रखरखीत उन्हात खडकाळ आणि  बॅकग्राऊंड मधे तो काळा पांढरा पक्षी शोधण्यात माझ्या नाकी नऊ यायचे. 



आता गडाची चढण अंगावर येत होती, वर चढताना अंगावर लोड येत होता... येताना जाताना जाणारी लोकं कौतुकानी बघत होती त्यामुळं अवनिचा उत्साह अजून कायम होता. एक कॉलेजच्या वयाची मुलगी गड उतरताना रडकुंडीला आलेली दिसली...  बाप जरा मिल्ट्री स्टाईल ... तिला कडक बनवायच्या मागं होता..  अजिबात मदत न करता सर सर पुढं चालत होता.. "बाबा जरा हेल्प करा ना", असं ती मुलगी बोलली आणि अवनि तिला क्रॉस झाली.. आता हि काही तरी डायलॉग मारणार.. "बाबा, एवढी मोठी मुलगी तरी तिला कसं उतरायला येत नायओ?" हे सगळं त्या दोघांना सहज ऐकायला गेलं असनार, त्यामुळं मी मागं बघण्याची आपली काय हिम्मत नाय झाली..."चल अवनि ते बघ तिथं दुकान दिसतंय म्हणून विषय बदलला"..

पुढं दुकानवाल्यानी ताक, लिंबू सरबत घेणार का विचारला तेंव्हा अवनि बरणीतल्या लॉलीपॉप कडं एकटक   बघत होती.. मग मी ऑरेंज आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर चे दोन लॉलीपॉप घेऊन तिला दिले.. आता लॉलीपॉप खात हि कशी चढणार आणि शेवटी उचलून घ्या म्हणणार..  म्हणालो वर गेलो कि खा.. ठीके बाबा म्हणत तिनी तो माझ्या बागेत टाकला...

आता मग माझ्या हाताचा घेत ती चढायला लागली. आणि उजवा पाय दुखतोय म्हणाली.. ते साहजिक होतं कारण प्रत्येकवेळी चढताना ती तोच पाय वर टाकत होती.. "अवनि थोडं दुखलं कि स्ट्रॉंग होतं माहितीयेका नंतर.." पुढं निघालो तर अवनि आता डावा पाय पुढं टाकत होती.. "बाबा आता ह्याला पन स्ट्रॉंग बनवते". पोरं जरा .. नाय जास्तच पुढची निघत्यात आई बापाच्या..

"बाबा किती वर आहे अजून?", "जवळच आलोय रेलिंग बघ".. एक तर ऊन जास्त लागत होतं, त्यात चढण जास्त होती.. "अवनि लॉलीपॉप देऊ का".. "नको बाबा वर गेल्यावरच खाणार"... "अवनि आईला विडिओ कॉल लावायचा का?".. "नको नको आईला वर गेल्यावरच करू कि सरप्राईझ"...  पुढं चालत आम्ही जवळपास वरच पोचलो.. मग शेवटची चढण चढायच्या आत एका दुकानात सावलीत बसलो.. दुपारची वेळ होती नेहमी पेक्षा गर्दी कमी होती त्यामुळं दुकानदार निवांत झोपला होता.. बाजूलाच सावलीत मी आणि अवनि बसलो.. दम खाऊन झाला तेंव्हा अवनिनी दुकानात नजर टाकली.. आणि म्हणाली "बाबा, असं दुकानात कोन झोपतं का ओ"... मी काय उत्तर देनार.. मला वाटलं आता हा इथून उठतोय आपल्याला.. दुकानदारानी तोंडावरचा रुमाल बाजूला करून एकदा बघितलं आनी परत झोपला.. आणि आम्ही हसायला लागलो...


दहा पंधरा मिनटं आराम केला.. आणि शेवटचा टप्पा पार केला... वर जाऊन भिंतीवर जाऊन हवा खात बसलो.
"बाबाSSS लॉलीपॉपSSS.."...  सुप्रियाला विडिओ कॉल केला... स्टॉल वॉर लॉलीपॉप कैरी, शेंगा खात आम्ही थोडा वेळ बसलो..





आता जवळपास ११-११.३० झाले होते.. माझा विचार आता सरळ गाडी पकडून पायथ्याला जायचा होता.. सहज अवनिला विचारलं कि गड बघायचा का? तर चक्क हो म्हणाली... चला कमीत कमी नरवीर तानाजी मालुसरेंची समाधी बघावी आणि देवटाक्यातलं पाणी प्याव.. पुणे दरवाजा, तोफखाना पार करत पुढं निघालो..


मला बर्फाचा गोळा जरा रिस्की वाटतो.. आणि आता हिनी तोच मागितला.. मग म्हणलो जाऊदे च्यायला एवढी चालून आली कि पोरगी, घेऊन दिला आणि देव टाक्याकडे निघालो..





"या साहेब बसायला सावलीत जागाये, पिठलं भाकरी, कांदा-भजी, ताक..", "येताना नक्की या" असे आवाज ऐकत देव टाक्याकडं पोचलो..


रायगड वरून आलेला एक ग्रुप पाण्याच्या बाटल्या भरत होता.. त्यांनी आम्हाला पण दोन बाटल्या भरून दिल्या.. आम्ही येताना पिलेलं पाणी उन्हामुळं गरम झालं होतं. पानी पिल्या-पिल्या "बाबा पाणी किती थंडये..., वाव.." पानी पिल्याचा आनंद अवनिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.. त्या ग्रुप कडून एक भगवा झेंडा घेऊन आम्हीदोनचार फोटो काढले आणि निघालो... "




परतताना तानाजी मालुसरेंच्या समाधीला नमस्कार केला आणि तिथल्या मावळ्यांच्या पुतळ्यांसमोर फोटो काढले.. त्यांनी कोणती शस्त्रं हातात घेतलीयेत वगैरे वगैरे गप्पा करत आम्ही परत निघालो..


वाटेत एका दुकानातून अवनिनी टेलिस्कोप मागितला माझ्यातला बाप आज उदार होता. सगळ्यात महाग घेतला, घरी एक असताताना. "बाबा तो जुना तुम्ही घ्या", "बर...".  मग जवळंच्या हॉटेलवर पिठलं-भाकरी, कांदा-भजीआणि ताक पिऊन भूक शांत केली.. 

सुप्रियाचे चार पाच मिसकॉल येऊन गेले होते.. पुढं जाऊन करू कॉल असं म्हणत घोड्याच्या पागे जवळ आलो तर जायचं तिकडं म्हणून अवनिनी हट्ट केला..





आता मी तिला किल्ला दाखवला का तिनी मला हा प्रश्न मला पडायला लागला.. पागा बघून, पायऱ्या उतरत आम्ही  निघालो.. आता पायऱ्या उतरताना मला कंटाळा आला होता, पन हिला प्रत्येक पायरीवरून उतरताना जम्प करायची होती... १०-१५ मिनिटं चालत वडाप करणाऱ्या गाडयांच्या पार्किंग मध्ये पोचलो.. गाडी खचा-खच भरल्याशिवाय काय निघणार नव्हता मी ड्रायव्हरच्या बाजूची सीट पकडली.. खिडकीच्या दारात कोपर ठेऊन अवनिला मांडीवर घेऊन डोळे मिटून बसलो.. मागं गुरं भरली असती तरी मला आता फरक पडणार नव्हता... थोड्या वेळानी गाडी स्टार्ट झाली.. आणि मग वळणावर कधी सिंहगडाचं, कधी खडकवासला धरणाचं दर्शन घेत गड उतरलो.. अवनि मस्तपैकी माझ्या हातावर डोकं टेकवून झोपी गेली होती... अजून सुप्रियाला फोन करायचा बाकी होता... पुढचा ट्रेक कुठला करायचा.. हिचा उत्साह असाच राहणार का?... हो .. कदाचित.. माहित नाही.  पण आजचा अनुभव अद्वितीय होता... आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्या लेकीला पन आवडावी आणि मग एकत्र त्याचा आनंद घेता यावा.. भावड्या अजून काय रे पाहिजे... सहजच मनात विचार आला ...

वर्षे जरी सोबती, नसतीलहि नशीबी, 
क्षण हे असे आम्हा दे, जगणे हो बेहिशेबी... 



-रा.जा. 

Sunday, 13 January 2019

नाशिक भटकंती भाग ३: अहिवंत


१४ नोव्हेंबर २०१८

अचला गड बघून आलो... सुरुवात तर मस्त झाली ट्रेकची... आता चलो अहिवंत... बुंगाSSSSSट... दुपारचे साडेतीनचार  वाजलेत.  उजेडात अर्धा तरी किल्ला चढून जायला पाहिजे तरच मुक्काम, भत्ता नीट, नायतर वाट लागणार. "माल्या भावड्या, ऱ्हा उभा आक्षीलेटर वर!"

आमच्या माहितीप्रमाणे अहिवंतगडावर जायच्या दोन वाटा. एक वाट म्हणजे अचलाची डोंगररांग तशीच बुध्याच्या बाजूनी पुढं जात अहिवंत गडाकडे पोचती त्या रांगेनी चालत जाणं, जाई पर्यंत दुसरा दिवस नक्की उजाडनार.. दुसरी वाट दरेगावातून, तिनी गेलो आणि गाईड बरोबर घेतला तर तासादीडतासात गडावर जाऊ शकतो... म्हुनून त्याच वाटेनी वर जायचं ठरलं.

अचला बरोबर टवाल्या, बुध्याचा डोंगर आणि कोल्हेर अशी डोंगररांग उन्हात मस्त चमकत होती. त्यांना रामराम करताना, मला उगीचंच, गावाकडं गेल्यावर भावकीला चुकवून लवकर निघायला जावं आणि निघताना सगळी चुकवलेली मंडळी एकदम दारातून आपल्याकडं बघताना दिसावी असलं फीलिंग येत होतं. पण त्याला काय पर्याय नव्हता.... भेटू परत.. रामराम... म्हणून आम्ही पुढं निघालो.

लवकर एखादा प्रॉपर माहिती देणारा मिळावा राव, उगंच भरकटत बसायला नको... असं म्हणालो आणि तिथून पुढं पाचच मिन्टात एक छोटंसं गाव लागलं. तिथं अहिवंत गडाचा रस्ता विचारून आम्ही पुढं निघालो...

बास, रस्ता कळलाय.. आता टाइम पास नको .. गाडी परत बुंगSSS .. नॉन-स्टॉप दरेगाव..



दरेगावात पोचताच समोरच अहिवंत गड दिसत होता...  पसारा चांगलाच दिसतोय.. पन जायचा रस्ता..? तासा-दीड तासात अंधार पडणार आपलं आपन शोधू पन राजे जर चुकलो तर?...  गडावर जाणं सोडा.. पण अंधारात फरफट .नको भाऊ.. कोन दिसतंय का बघा... गाईड शोधा? ...  असं म्हणायला आणि लगेचं "मुछोकि नयी हरियाली, बॉडी इष्टील वाली, जैसे अमावास का चांद, माने धोबिको दिन भरका काम, कान मे बाली, या बालिमे कान, बत्तीसी के कलर के आगे झक मारे सोनेकी दुकान.." डिट्टो फॅन्ड्रीतला झब्या ... आता ह्याला रस्ता विचारावा का. पण काय ऑपशन तर नाय ... चला विचारून बघू... "इतुन गडावर कसं जायचं?"...एवढंच विचारलं  तर पुढं पाच  मिनटं...  डायलॉग, ऍक्शन, इमोशन अँड ड्रॅमा, नॉन स्टॉप... "माल्या च्यायला पाच-दहा ची टाकलेला लावटी पंटर नायनाबे? जायचा पुढचा प्लॅन बाराच्या भावात.. शॉट नको"... आता माल्याच्या अंगात जग्गा जासूस शिरला..  "भाऊ तू कधी गेलता, कसा गेलता, अजून कोन गाईड मिळलं का जायला?..."  मग शेवटी, त्याच्याकडून गडावर जायला बारीतून(खिंडीतून) सोपी वाट आणि तिथून अर्धा-एक तासात सहज गडावर जाऊ शकतो हि कामाची माहिती एकदाची मिळावली... तरी पन जरा डाऊट होता म्हनुन परत एक जनाला रस्ता विचारून त्या पोरानी सांगितलेली माहिती कन्फर्म केली आणि निघालो तडक खिंडीकडं..




खिंडीकडं जाणाऱ्या नागमोडी रस्त्यावर मधूनच सप्तशृंगीची डोंगररांग मस्त दर्शन देऊन जात होती. सप्तशृंगी गडावर पायी आणि गाड्या घेऊन जाणाऱ्या भक्तांच्या रांगापण दिसत होत्या. आम्हाला आता खिंडीचे आणि नंतर मुक्कामाचे वेध लागले होते.. साधारण १५-२० मिंटानंतर खिंडीत येऊन पोचलो... खिंडीचा हा रस्ता दरेगाव आणि बेलवाडी हि गडाच्या पायथ्याची गावं जोडतो, त्यामुळं अधून मधून ये-जा करनाऱ्या एकदोन गाड्या दिसत होत्या.. आपली गाडी कुठं लावायची कारण मुक्कामी वर जाणार म्हणजे खिंडीत गाडी लावणं जरा रिस्की वाटत होतं..   पण काय ऑपशन नव्हता.. तिथंच एक गाडी लावली होती तिच्या मागं गाडी दिली लावून बघू व्हईल ते व्हईल...

जायचा रस्ता नीट माहित नव्हता पण पटापट आवरायचं म्हनुन आधी बॅगा भरायला घेतल्या... वरून कोन तरी येतंय असं दिसत होतं.. चिल्ली पिल्ली होती. आम्हाला वाटलं येतील गड दाखवायला पण घरी सांगितलं नाही म्हणून त्यांनी काय इंटरेस्ट दाखवला नाही. जाऊदे गडावर जायचा रस्ता तरी कळाला.... थोड्यावेळानी परत डोंगरावरून दोन-तीन डोकी खाली येताना दिसली. खाली आल्यावर जरा विचारपूस केल्यावर ते आधिपन दोन-तीनदा येऊन गेले होते, वर भरपूर पाणीये, एक जिवंत झरा पने डोंगराच्याकडला दरीच्या बाजूला, गड लई मोठाय, मंदिर हाये पन झोपायची सोय नई...  अशी माहिती कळाली.  एवढं सांगून ते गाडी घेऊन आपल्या मार्गाने निघून गेले.

वर पाणी आहे हे ब्लॉग वर वाचून माहित होतं पण कुणीतरी नुकतंच जाऊन आलेलं सांगून गेल्यानं आम्हाला तसं रिलॅक्स वाटत होतं. मग बॅगा पटापट भरल्या.. प्रत्येकी दोन बाटल्या पाणी, जेवनाच सामान. माल्या म्हणाला टेन्ट पण घेऊ वर मुक्काम उघड्यावर करावा लागणारे. खरं तर मगाशी चौकशी केलेल्या त्या मंडळींमध्ये, एक पोरगी साडी घालून पायात साध्या चपलांवर वरून जाऊन आली होती हे आम्हाला दिसलं होतं. त्यामुळं वाट काय जास्त अवघड नसणार हे नक्कि होतं.. काय प्रॉब्लेम नाय टेन्ट घ्यायला.. असं म्हणत टेन्ट बिनविरोध मंडळाच्या सामानात सामील झाला.. नायतर कुनी सांगतंय म्हनून एक्सट्रा पाण्याची बाटलीपन कोन घेतंय...
सूर्य काय अजून मावळतीला लागलानव्हता, बॅगा चढवल्या खांद्यावर.. ५.३० वाजले होते फक्त.. उजेडात जाऊ रे  सपसप... चला असं म्हणत आम्ही चढाईला सुरुवात केली.





अर्धा  पाऊणतास चढाई नंतर जवळ जवळ माथ्यावरच आलो.. थोडं अंतर अजून.. मधी थोड्या पायऱ्या लागल्या, आता थोड्या वेळात अंधार होणार त्यामुळं लवकर मुक्कामाची जागा सापडावी हेच सगळ्यांना वाटत होतं. तेवढ्यात एक गुहा दिसली.. इथं पाणी असलं तर मुक्कामाला मजा यील.. जवळ गेलो तर गुरांनी शेणाचा सडाच टाकलेला... जवळ पाण्याचं पण काय नाव नाय. नकोच हितं चला वरतीच बघू ...  असं म्हणून पुढं निघालो... 





पाच मिनटं चाललो तर गडाच्या माथ्यावर पोचलो.. च्यायला आलो पण वरती SSS .. आता काय मुक्कामाची जागा शोधा, लाकडं शोधा.. पाणी काय असल जवळच कुठंतरी.. बरं झालं अजून सूर्यास्त नाय झाला.. गडावरती काय हायनाय ते दिसतंय थोडं तरी... अशी चर्चा करत पुढं निघालो. लांबून एक पठार, भरपूर गुरं, खाली जमीनीचा बराचसा भाग काळा खडकाळ, मधोमध टाकं असल्यासारखं दिसत होतं. गुरं आहेत टाकं आहे पाणी असनार, चला जरा झपझप. अर्रर्रर्र... जवळ गेलो तर टाकं कोरडं निघालं. म्हणजे पाण्यासाठी अजून फिरावं लागणार. सात वाजले होते. पुढं निघालो. पुढं दगडांची पडकी जोती, आधी बऱ्यापैकी बांधकाम असनारा, पायऱ्या, दरवाजा, कोठी,असा भाग लागला. एकंदरीत बांधकाम बघता किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग असनार असं वाटत होत. नंतर ब्लॉग मध्ये पण तसा उल्लेख सापडला. 



आम्ही पुढं सरकतोय... सूर्य खाली येतोय.. हसतोय का? का हसतोय??... पुढं कायवाढून ठेवलंय? बघू पुढंचं पुढं... पाण्याचा एखादा घोट घेत सूर्यास्त बघत आम्ही पुढं सरकत होतो. दरवाजाचा तो टप्पा पार केला पुढं परत पठारावर आलो. अंधार पडत आला होता. आमच्याकडचं निम्म पाणी संपलं होतं, त्यामुळं पाणी आता आणीबाणीचा विषयच  झाल्ता. मग बॅगेतून टॉर्च बाहेर काढल्या आणि तिघं एक बाजू पकडू आणि शोधू पाणी म्हणून शोधाशोध चालू झाली. मला जाम कंटाळा आल्ता... किल्ले फिरताना काय नाय वाटत पन असली शोधाशोध जीवावर येती. पन पाणी मिळालं तर म्हणजे जेवण आणि मुक्काम झकास होईल ह्या एका आशेपायी मी लढत होतो. माल्याला असल्या वातावरणात त्याच्या सुप्तगुणांना वाव मिळत असल्यानी चेव चढतो.. मन्याला कशाचा काही फरक पडत नसतो..  

पुढं थोडं लांब किल्याच्या मधोमध टेकडी दिसत होती.. आम्ही तिच्या डाव्या बाजूला होतो. एकदा वाटलं असायचं पाणी पलीकडं आणि आपण शोधत बसायचो अलीकडं... च्यायला.. पण कोन जायचं पलीकडं चढून.. मरूदे इकडं टेकडीच्या अलीकडं शोधू मिळालं तर नशीब. मी डावीकडं, मन्या मधी आणि माल्या उजवीकडं असा शोध चालू . पार अर्धा तास झाला तंगड तोड करत होतो पन पाणी काय दिसलं नाय.  तेवढ्यात मन्याचा "तळं दिसतय या लवकर" असा आवाज आला. जवळ गेलो तर च्यामारी गुरांनी पाणी पार गढूळ करून टाकल होतं. शोधमोहीम परत चालू .. चालत चालत पार त्या टेकडीच्या बाजूलाच आलो. टेकडीवर मधे एक झेंडा पन दिसत होता..  आता उगंचच वाटत होतं वर गेलो तर पाणी दिसल.  त्या आशेनी तिघंपन गेलो टेकडी चढून... एवढा आटापिटा करून चढलो एकदाची टेकडी खरी पण कसलं काय, ना टेकडी वर ना टेकडी पलीकडं पाणी... आसलं  तरी आता काय दिसतंय.. काळा कुट्ट अंधार.. त्यात मगाशी बाजूचं एवढं मोठं तळं आम्हाला लवकर दिसलं नाही तर पाण्याचा बारीक झरा कधी दिसणार... 

८ वाजले, आपण मेजर गंडलोय असं मला वाटायला लागलं.  मग ज्या बाजूनी टेकडी चढलो त्याच बाजूने टेकडी उतरलो. मला कडकडून भूक लागली होती, डोकंपन चालत नव्हतं. "माल्या, पाणी मिळलं तवा मिळलं बेकार भूक लागली मला आता डोकं आऊट झालय खाऊ कायतरी"  मग त्या टेकडीच्या पायथ्याशी बसून आमचा एक भेळीचा ब्रेक झाला. आता कुठं बरं वाटायला लागलं.  पाण्याची लेवल अजून खाली आली. 

"मन्या ए बैलाSSS , पाळंदेंच्या पुस्तकातला गडाच्या माहितीचा फोटो घे म्हन्लो होता ना? दहा वेळा सांगूनपन तू घेतला नाय!!!"...  मन्याला शिवी घालत बसल्या बसल्या माल्यानि ब्लॉगवरून किल्ल्याची माहिती परत परत वाचायला सुरुवात केली.  मग ट्यूबलाइट पेटली.  ब्लॉगमध्ये सांगितलेल्या महत्वाच्या खुणांपैकी एकपण खूण आम्हाला आत्तापर्यंत दिसली नाही.. काय काय लिहलंय माल्या... "सप्तशृंगी-मारुती मंदिर, गुहा आणि झरा... ".  साधारण १० मिनिटं किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडं चालत गेलो, एक मंदिर दिसलं. खरं तर टेकडीवर चढून ती बाजू मी मगाशी बघितली होती पण अंधारात काहीच नाही दिसलं . मंदिराजवळ गेलो. मंदिर ओपन दिसतंय झोपू नाही शकणार इथं. सप्तशृंगी आणि मारुतीच्या मूर्ती दिसल्या. आणि बाजूलाच जवळच अजून एक तळं दिसतय, पण तेपन कोरडंच होतं..  


मंदिर सापडलं, वाचलेल्या माहितीमधली पहिली खूण मिळाली... आता मात्र आमचा उत्साह वाढला. पुढं मंदिराकडून टेकडी उजवीकडं आणि दरी डावीकडं ठेऊन चालत जायचं होतं, मग सुरुवातीला दरीच्या बाजूला गुहा आणि नंतर पुढं पाणी दिसणार अशा खुणा ब्लॉगमध्ये सांगितल्या होत्या. त्याप्रमानं आम्ही गुहा कुठे दिसतीये का ते शोधत होतो. पण गुहा सापडण्याचं काय नाव नाय... मन्या तर पार लांब तिकडं गडाच्या टोकावर जाऊन आला... पण काय फायदा नाय झाला.. आता अंधारात  गुहेच्या तोंडापाशी गेल्याशिवाय गुहा असली तरी आम्हाला दिसनार का हा पन प्रश्नचं होता म्हणा. मधूनच आपण चुकीच्या दिशेने शोध घेतोय का असले डाऊट माझ्या डोक्यात यायला लागले. जवळपास अर्धा तास भटकल्यानंतर माल्या एका दरीच्या साईड ला काही तरी दिसतंय म्हणाला.. मग जरा खाली उतरून गेलो तर गुहा. चांगली प्रशस्त आणि स्वच्छ.. गुहे समोर जागा पण ऐसपैस... झोपण्याची सोय मस्त... कडक... गुहेत बाजूला एक टाकं पन दिसलं, इथं पावसाळ्यात पानी असन्याची शक्यता आहे, पन आता मात्र अजिबात पानी नव्हतं. गुहेतून बॅगा घेऊन परत पाणी शोधायला वर आलो, आणि पुढं चालायला लागलो. 

ज्या टेकडीला आम्हाला उजवीकडं ठेवायचे होतं तिची एक बाजू संपली आणि आम्ही तिला वळसा घालत होतो... ब्लॉग प्रमानं पाणी आम्हाला आतापर्यंत सापडायला पाहिजे होतं.  च्यायला पाणी असलं तरी सापडायचं का आता, काळ्याकुट्ट अंधारात बॅगा पाठीवर टाकून आमची शोध मोहीम अखंड चालूच. माल्या जरा पुढं गेला. साधारण १० मिनिटे चालल्यावर... "झरा सापडला रे..." असा त्यानी आवाज दिला.  आम्ही मंदिरापासून ज्या जागेवरून टेकडीला धरून पाणी शोधायला सुरुवात केली त्याच्या तिरक्याविरुद्ध बाजूला आम्हाला पाण्याचा झरा सापडला... 




मग आम्ही कुठं माती खाल्ली? एकतर दरेगावातून वर आलो असतो तर पाणी लगेच मिळालं असतं.. पण वेळ नव्हता आणि गाईड पण.. मग झब्याकडून नवी सोपी वाट कळाली.. म्हणून आम्ही चढलो दुसऱ्या बाजूनी.. त्या बाजूनी गेल्यावर किल्ल्याचा सगळा पसारा पालथा घालून दरेगावाकडून आलेल्या टोकाला जाण्यात काय पॉईंट नव्हता.. तेवढा वेळ पण नव्हता ... आता दुसरा पाण्याचा पॉईंट म्हणजे गडाच्या मध्यावर असलेल्या टेकडी जवळचा बारीक झरा .. आमची सगळी भिस्त त्याच्यावरच होती... पुस्तकात मॅप होता, पन टेन्ट आरामात वागवणाऱ्या मन्याला फोटोचं वजन जास्त झालं मोबाईल खेळण्याच्या नादात तो फोटो काढायला विसरला...  अशा परिस्थितीत उजेड असता तर एखाद्या वेळेस झरा लवकर सापडला असता पण आम्हाला पार अंधार झाल्ता टेकडी पर्यंत पोचे पर्यंत.. त्यात ब्लॉग वाचून पाणी दरीच्या आमच्या कडच्या बाजूला दिसणार आहे असं आम्हाला वाटत होतं... तो अंदाज पण  चुकीचा झाला.. त्यामुळं अजून घोळ झाला, गडाचा पसारा मोठा होता त्यामुळं आधी दरीच्या बाजूनी लांब लांब गुहा आणि नंतर पाणी आम्ही शोधत बसलो.. 

बॅगा खाली टाकल्या आजू-बाजूला बॅटरी मारून सेफ आहे अशी खात्री करून घेतली. हातानी गटागटा पाणी पिऊन घेतलं.  झऱ्याचं थंडगार, नितळ पाणी जरा जास्तच गोड लागत होतं. पाणी सापडलं खरं, पण गडाच्या माथ्यावर लवकर पोचून सुद्धा तब्बल २ तास पायपीट झाली आणि  पुढं जेवण बनवा, खा आणि टेन्ट लावून झोपा....

रात्रीचे ९.१५ झाले होते.  पाच दहा मिनिटाच्या अघोषित विश्रांतीनंतर, थंडगार पाणी पिऊन, झालेली सगळी पायपीट आम्ही विसरून गेलो. माल्यानि स्वयंपाकासाठी दगडं बघून चूल लावायला सुरुवात केली. मन्या आणि मी लाकडं गोळा करायला लागलो.  मसाले, अंडी , तांदूळ पटापट बागेतून बाहेर काढली... पण रेसिपि कुणाला माहित? माल्याला मोबाईलवर ढाबा स्टाईल अंडा-करी व्हिडिओ सापडला.. मग त्यातल्या अनुनासिक का काय ते.. तसल्या (आमच्या  भाषेत घशात शेंबूड अडकल्यासारख्या) आवाजात रेसिपि ऐकत अंडा करीचा  बनवायचा निर्णय मंडळानी घेतला...अंडाकरी झाली.. अंडा करीला राईसशिवाय काय मजा म्हणून दोघांना कन्व्हिन्स करून मी पातेल्यात भात पण लावून दिला. भूकतर एवढी लागली होती कि पोटातले कावळे घशात आणि तिथून डोळ्यात येऊन "झालं का रे जेवण तयार???" असं विचारून जातायत असं मला बऱ्याच वेळा वाटलं... मग तासाभरात घरून आणलेल्या भाकऱ्या, अंडा करी आणि भात असा जबरी मेनू तयार झाला. त्या सगळ्यावर ताव मारत, जोडीला कांदा तोंडी लावत आम्ही मस्त जेवण केलं.  जरा जरी आडवे झालो असतो तर जागेवरच झोपलो असतो म्हणून जास्त सुस्ती यायच्या आत पटापट भांडी पण धुऊन टाकली. 




लयी बेकार झोप येत होती राव, कधी एकदा झोपतोय असं झालतं. जास्त कष्ट नको म्हणून जिथं चूल आहे त्याजवळच झोपावं असा प्लॅन जेवताना ठरला होता, पण सामान तिथं ठेवायला जायच्या आधी सहज चेक करावं म्हनुन बघितलं तर बाजूलाच दगडाच्या फटीत सापाची कात दिसली... 



मग त्याजागेवर मुक्कामाचा प्लॅन लगेच कॅन्सल करून टेन्ट लावण्यासाठी वरच्या बाजूला जवळच एक सपाट जागा शोधली. आता पटकन टेन्ट लावून आडवं पडायचं बास... पण नाही वारं एवढं भयंकर होतं कि लावलेला टेंट उडून जाईल.. आत झोपलो तर.. फाटून जाईल नायतर काड्या तरी नक्कीच तुटून जातील अशी लक्षणं... परत बॅगा खांद्यावर गुहेतच मुक्काम.. तंबू काढून बॅगा खांद्यावर..  मिरवणुकीवरून परत आलेल्या मंडळाच्यासारखी गत झालती.. त्या मेंगाळलेल्या अवस्थेत मंडळ गुहेकडे निघालं...  सुदैवाने येताना गुहा सापडली आणि पाण्यापासून ती जवळच होती त्यामुळं तसं काय टेन्शन नव्हतं... 

गुहेत पोचल्यावर पटापट बॅटऱ्या मारून आजू बाजूला सगळं ओके आहे ना ते पहिलं बघितलं. तशी खात्री झाली मग त्यातल्यात्यात जास्तीत जास्त सपाट जागा बघून आम्ही तंबू लावला... सगळं सामान तंबूत ठेवलं, पायातले बूट काढून ठेवले. पाठ टेकवण्याचा स्वर्गीय आनंद घेत, न घोरण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची एकमेकांना आठवण करून देत जमिनीवर अंग टाकून दिलं. सकाळी शिव्या नको पडायला म्हणून पडल्या पडल्या गजर बंद करायला मोबाईल हातात घेतला, रात्रीचे १२ वाजले होते. गडावर येताना आम्हाला नक्कीच हसत असणारा तो सूर्य पृथ्वीच्या कुण्या कोपऱ्यात पुढच्या शिफ्टला रुजू झालाअसनार... आमची पन एकदाची सुट्टी झाली..  डोळे मिटले...  प्रतिहास्य दिलं आनी निद्रिस्त झालो ...

१५ नोव्हेंबर २०१८


सकाळी ७ वाजता जाग आली, समोर मस्त नजारा दिसत होता. गुहेबाहेर काल रात्री आम्हाला फक्त काळोख दिसला होता. आता मात्र दरीचा पूर्ण विस्तार आणि खोली आम्हाला टेन्टमधून बसल्या बसल्या दिसत होती. एकदम व्हॅली व्हिव. बाकीची गॅंग पण आता उठली होती. मग एक छोटा फोटो सेशन झाला...  






टेन्ट आवरला..  बॅगा घेऊन गुहेच्या बाजूनी चढून परत माथ्यावर आलो. पाण्याच्या स्पॉटला परत एकदा जाऊन पोटं हलकी केली. पोटभर पाणी पिऊन बाटल्या टॉप अप केल्या आणि खिंडीच्या दिशेनं चालायला लागलो. सकाळचे ८-९ वाजले असतील. मस्त कोवळं ऊन पडलं होतं. झपझप पावलं  टाकत आम्ही निघालो. तेवढ्यात पुढं मला काहीतरी हालचाल दिसली. "साप..  सापSSS.. "  आम्ही तिघं पण तिकडं पळालो. धामण ... सकाळचं कोवळं ऊन घेत सरसर चालली होती.. आम्ही शक्य तेवढे फोटो काढून घेतले. आमची चाहूल लागल्यावर पटकन ती एका फटीमध्ये घुसली.. आता काय लवकर बाहेर येत नाय. गप काढलेत त्या फोटोंवर समाधान मानून आम्ही लगेच पुढं निघालो...






पुढं परत पठार आणि कोरडं टाकं लागलं, काल रात्री दिसलेली गुरं काही आजूबाजूला दिसत नव्हती. पोटं हलकी झाल्यानी पोटाचा गजर वाजायला लागला. मग तिथंच बॅगा खाली ठेवल्या. रात्री जेवण बनवताना लक्षात ठेवून एक्सट्रा अंडी उकडलेली.  ब्रेड, अंडी, सॉस आणि चीझ असं मस्त सँडविच खाऊन पोटाला तात्पुरता आधार दिला.




पुढं अर्धा पाऊण तास चालल्यावर खिंडीत उतरायच्या रस्त्याला लागलो. नंतर पंधरा वीस मिंटात खिंडीत गाडीजवळ पोचलो. सगळं सामान परत गाडीत ठेवलं आणि दरेगावाकडं निघालो.

खिंडउतरून गाडी सप्तशृंगीच्या दिशेनं वळवली..  जवळपास काही चांगलं हॉटेल दिसत नव्हतं म्हणून वनीत जाऊन भत्ता टाकायचं ठरलं.  एकंदरीत ह्या भागात भारी भारी किल्ले आहेत. त्यातले मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही मोहिम गेल्यावर्षी झाली, मग ह्या मोहिमेतला पुढचा किल्ला कुठला?  माल्यांच्या लिस्ट मधला मोहनदरी किल्ला तिथून जवळच होता. किल्ल्याचा फोटो बघितला, नेढं काय भारी दिसत होतं... आयच्या गावात... क्लाSSSसच ...                                                                                                     
                                                                                                                       क्रमश:


किल्ल्याबद्दलची  माहिती 
पायथ्याचे गाव: दरेगाव, बेलवाडी

जाण्याचे रस्ते: दरेगावातून, दरेगाव आणि बेलवाडीमधल्या खिंडीतून, अचलावरून  

पाण्याची सोय: दरेगावातून वर गेल्यावर टाके,  किल्ल्याच्या मधोमध टेकडीच्या तळ्याच्या बाजूला झरा  

मुक्कामाची सोय: पायथ्याच्या गावात होऊ शकते, किल्ल्यावर सोय नाही 

महत्त्वाच्या खुणा: खिंडीतून चढताना माथ्याजवळ पायऱ्या आणि  गुहा, पठार , कोरडं टाकं, पायऱ्या, दरवाजा पडलेला भाग, टेकडी, दोन तळी, मंदिर, सप्तशृंगी मारुती मुर्ती, दरीच्या बाजूला गुहा...     

जवळपासचे किल्ले/डोंगर:  
अचला, मोहनदरी, कोल्हेर