अचला, १४ नोव्हेंबर २०१८
मंदिरात उभारलेला तंबू बहुदा गावात कुतूहलाचा विषय झाला असावा, सकाळी पक्षांच्या किलबिलाटासोबत गावातील लोकांच्या बोलण्याच्या आवाजांने मला जाग आली. माझी झोप मस्त झाली होती. बाजूला बघितलं तर, "सकाळी पटापट उठा रे जास्त टाइमपास नको इथं" असं सांगणारा माल्या अजून पसरलेलाच होता, त्याच्या बाजूला झोपलेला मन्या या कुशीवरून त्याकुशीवर करत कुणीतरी आपल्याला शिव्या घालून उठवण्याची वाट बघत होता. मग जरा सूड घ्यायच्या इराद्याने मी माल्याला गदागदा हलवलं. तसं बारीक तोंड करत माल्या उठला... "मस्त झोप झाली रे माल्या एक नंबर जागा मिळाली झोपायला..", यावर "कसलं काय, तुम्हाला चांगली सपाट जागा मिळाली, मला माझी पाठ पण नीट टेकत नव्हती सपाट..." असं काही म्हणत अर्धवट झोपेतुन माल्या उठून बसला.. मग "पाठ जरा मोकळी करतो का?, वढ रे जरा हिकडं.. आ SS .." असले आवाज ट्रेकच्या पहिल्याच दिवशी आणि सकाळी सकाळी नको ऐकायला म्हणून माल्याला हळूच म्हणालं "माल्या टेन्टच्या बाहेर कोणीतरी आहे वाटतं?...". घरात दोन पोलिस आणि बालपण पोलीस लाईनीत गेलं असल्याने आपण पण पोलिसात आहोत अश्या थाटात वावरणाऱ्या माल्याला अशी पिन मारली कि त्याच्यातला सुप्त पण अर्धवट पोलीस जागा होतो आणि तो झालाच.. मग लगेच आवरा आवरीच्या हालचालींना वेग आला... जणू काही आपल्यावर कोणी तरी वॉच ठेऊन आहे अश्या आणि आपल्याला त्यांच्या न कळत निघायचंय असं वातावरण तयार झालंय असं मला वाटायला लागलं.. पण माल्याच्या मते असल्या खुफिया(माझ्या मते भुरट्या) हालचाली लयी महत्वाच्या असतात.. मग त्या जोशात मन्या वाट बघत असलेली शिवी त्याच्या कानावर पडली.. "अरे बोकडाSS उठ", का "ए ए बैला SS" असं काही तरी कानावर पडलं. मग सकाळी सकाळी काकड आरती किंवा अजाण कानावर पडावी आणि मस्तपैकी जाग यावी अशा मूड मध्ये मन्या उठला.. "दादा अरे मस्त झोप लागली होती... ", यावर तुसड्या(जो पेटीवर सापडत नाही) सुरात, "चटपट आवरा बे, इथं जास्त वेळ थांबायचं नाय, जास्त काही उघडतं बिघडत बसू नका... टेंटच्या ह्या बाजूने बाहेर निघा..." अशा काही सूचना (मला सांगितलेल्या सुचानांन मध्ये वाढ करून) माल्या मन्याला सांगत होता. मग आम्ही आतल्या स्लीपिंग बॅगा आहेत तशा त्याच्या कव्हर मध्ये कोंबल्या आणि भिंतीच्या बाजूने(जेणे करून कोणाला टेन्ट मधलं काही दिसू नये, तसं नव्हतंही काही आत पण... सकाळी सकाळी वाद कोण घालणार... ) टेन्टच्या बाहेर आलो...
बाहेर आल्यावर मंदिरापासून लांब, काही लोक मंदिराच्या बाहेर आपली नेहमीची कामे करण्यात व्यस्त दिसले. तसं आमचं काय चाललंय हे बघायला तिथे कोणाला काही इंटरेस्ट नव्हता. एक कुत्रं तेवढं घुटमळताना दिसलं टेंटच्या बाजूला. पण आम्ही बाहेर आलो नसतो तर पाय वर करून आपली लघुशंका निरसन करून घेण्याशिवाय त्याला त्यात काही रस नसावा... पण आमच्या चमू मधील पोलिसानी तो हाणून पाडला... हे सोडून चोर दरवाजाने बाहेर यायचा तसा काही उपयोग झाला नाही... मग ठरल्याप्रमाणे जास्त गाजावाजा न करता आम्ही टेन्ट आवरायला घेतला.. गाडी अनलॉक केली आणि सगळं सामान परत डिकीत जमा केल .
तेवढ्यात माल्या कोणाबरोबर तरी बोलायला जात असलेला दिसला.. मन्या आपला मोबाईल वर गुड मॉर्निंगचे मेसेज टाकण्यात बीजी होता... मी गावात इकडे तिकडे आजू बाजूला काय आहे ते बघत होतो... मंदिराच्या सभामंडपातून अचलागडाचा पसरलेला विस्तार स्पष्ट दिसत होता. किल्ल्याकडे नजर टाकताच लक्षात आल, पहाटे कोणीतरी गडावर आग पेटवून दिली होती. एका वरच्या टप्प्यातलं बरंचसं गवत जळून गेलं होतं तो भाग लांबूनही काळाकुट्ट दिसत होता. आता आमच्या गड चढाईत याचा काय परिणाम होईल असा काही बाही विचार करत मी फिरत होतो.. सहजच मंदिराच्या बाजूला आम्ही ज्या रस्त्यानं आलो तिकडे लक्षं गेलं तर तिकडे काही वीरघळीही दिसल्या.
या दरम्यान काही गावकऱ्यांसोबत वाटेबद्दल चर्चा करताना, माल्याने त्या डोंगरावर फार वर्षांपूर्वी कोण्या अचलनाथ बाबांचे वास्तव्य होते अशी माहिती(जिचा तसा आम्हाला काही उपयोग नव्हता) काढली. मग गावात जास्त वेळ न घालवता प्रातःविधी उरकून लवकरात लवकर चढाई चालू करावी अशा उद्देशाने आम्ही गाडी काढून गावातून निघालो. गावातून बाहेर निघताना आपल्याकडच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या भरून घेऊ म्हणून माल्याने गाडी गावाबाहेर थांबवली... जवळ कुठं पाणी दिसतंय का हे आम्ही बघत होतो. जवळच एका शेतात एक मामा आपल्या बैलजोडीने शेत नांगरत होते.. शेताच्या आजूबाजूचा परिसर भिजलेला दिसत होता. पाणी इथंच कुठंतरी असावा असं आम्हाला वाटत होतं. पण पाणी काही दिसेना.. मग लांब कुठे तरी एक ठिकाणी पाण्याचा साठा दिसला पण तो जरा अडचणीच्या जागेत होता उतरायला कठीण.. आमचे शूरवीर मावळे लगेच मोहिमेला तयार झाले. मन्या खाली जायला आणि आम्ही दोघं त्याला गाईड करायला.. शेतात काम करणाऱ्या मामांना आमचा इरादा कळाला असावा.. "मागं हापशी है पोरांनो" असा आवाज आला... मग आम्ही मागे वळून बघितलं तर आम्ही ज्या जागी उभे होतो त्याच्या मागेच पाण्याचा हापसा होता.. आमचं आम्हालाच हसू आलं (शिक्षण जरा जास्त झालय बाकी काय).. मग गाडी थोडी मागे घेऊन आम्ही पटापट रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्यांवर जवळंच असलेल्या त्या कूपनलिकेतून टॉप अप रिचार्जे मारला आणि पुढे निघालो.
गावातून बाहेर आल्यावर अचलगडाची पूर्ण डोंगररांग आता स्पष्ट दिसत होती. तिथून आम्हाला तीन डोंगर दिसत होते. मधला डोंगर हा अचलागड. डावीकडे 'टवल्या' आणि उजव्या बाजूस 'बुध्या'. बुध्याच्या मागच्या बाजूस अहिवंतगड असा ट्रेकर्ससाठीचा पट्टा आहे असं ब्लॉग मध्ये बघून आम्ही लगेच कन्फर्म केलं.
डोंगराकडचा रस्ता बघावा म्हणून सगळे निघणारच होतो तेवढ्यात वाटेत एक आजोबा भेटले. मग त्यांनी अचलगडाची वाट, अचला आणि बुध्या यांच्या मधल्या खिंडीतून जाते असा खुलासा केला. लगेच आम्ही खिंडीच्या दिशेने निघालो. खिंडीकडे जायला थोड्या अंतरापर्यंत डांबरी रस्तादिसला. हा रस्ता पुढे आम्हाला डोंगराकाठच्या झाडीत नेऊन सोडत असावा असं म्हणून आम्ही पुढे गाडी हाकायला सुरुवात केली. आता सकाळी उठून आम्हाला एक तास तरी झाला होता. हवी अशी जागा न मिळण्याने शिकारी खोळंबल्या होत्या. मधे एक झाडीचा कमी वर्दळ असलेला पट्टा दिसला, मग लगेच घोडे थांबवून शिकारी उरकायचा निर्णय मंडळाने घेतला. मग पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन जवळपासच्या झुडुपात जाऊन सगळे मावळे शिकार करून आले. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक टवटवी दिसत होती. गाडीतलं वजन हलकं झाल्यानं तडक गाडी काढून आम्ही पुढे निघालो. डांबरी रस्ता संपत आल्यावर अलीकडे एक घर दिसले. आता गाडी पुढे नेणं रिस्की दिसतंय असं आम्हाला वाटलं. त्या घराबाहेर एक बाबा दिसले, त्यांनी आम्हाला गाडी लावायला जागा दाखवली. मग आम्ही त्या घराच्या समोरील रस्त्यापलीकडे एका डेरेदार झाडाच्या सावलीत सुरक्षितपणे गाडी लावून दिली.
ते घर बऱ्यापैकी बांधलेलं होतं. घरातील मंडळींमधे, एक बाबा, दोन माउली आणि ४-५ चिल्लीपिल्ली अशी नजरेस पडली. जरा मोठी पोरं नुकतीच डोळे चोळत झोपेतून उठून बाहेर आली होती आणि ही कोण माणसं आलीत इकडं असं एक्स्प्रेशन देऊन आमच्या कडे बघत होती. बाजूलाच रस्त्यावर, तान्ह्या बाळांना त्यांची आई पातेल्याचा बाथ टब बनवून कोवळ्या उन्हात मस्त खंगळून काढत होती.
शिकारी यशस्वी झाल्याने पोटातले कावळे ओरडायला चालू झाले. आता पोटात काहीतरी गेलं पाहिजे म्हणून लगेच मन्यानी बाबांना "चहा भेटलं का ओ" असं विचारताच, "दिऊ कि करून, पर दूद नई .. काळा च्या मिळलं SSS " असं हातातल्या बिडीचा एक झुरका घेऊन, तोंडातला धूर बाहेर काढत... एकदम चिल्लरचा मोठा गठ्ठा कोणी फरशीवर ओतावा तसा, कफ-खोकला आणि आवाज एकत्रं करून एक मिश्किल हास्य देत बाबा बोलले. मग लगेच आमच्या गाडीतून दुधाचा एक टेट्रा पॅक काढला आणि त्यांना दिला. थोड्या वेळाने एक माउली हातात एक ताटली आणि त्यात चार कप घेऊन आली. पुढं बाबांबरोबर गप्पा मारत दुधाचा गरम गरम चहा आणि क्रीमरोल अशी शाही न्याहारी आम्ही केली.
पोटात चहा आणि दिलेली बिस्किटं गेल्यावर, बाबां सुसाट बोलायला चालू झाले.. त्यात "गडाकडे जाणारा रस्ता कसा कच्चा आहे, दोन चाकी गाडी घेऊन जाणे शक्य आहे पण चार चाकीसाठी अजिबात पर्याय नाही. आणि खिंडीपर्यंत जाण्यासाठी पलीकडच्या गावातून चांगला डांबरी रस्ता आहे, पण काही राजकीय कारणांमुळे ह्या गावातून खिंडीपर्यंत जाणारा काही भाग अजून कसा कच्चाच आहे" अशा अनेक विषयांना त्यांनी हात घातला. आता आमची न्याहरी उरकली होती. मग भविष्यात लवकर हा रस्ता होवो अशी मनात प्रार्थना करून "अचलनाथ बाबांकि जय!!!...", घोषणा देऊन आम्ही ९.३०-१०.०० वाजता त्याघरापासून खिंडीकडे चालयाला सुरुवात केली.
घरापासूननिघाल्यावर रमत गमत साधारण १५-२० मिनिटात आम्ही खिंडी पर्यंत पोचलो. तेवढ्यात पलीकडच्या गावातून दुचाकीवर आलेली दोन पोरं आम्हाला दिसली. मग त्यांनी "ह्या इकडून मागून रस्ता जातोय गडावर" असं सांगून आम्हाला गड चढाईची वाट दाखवून दिल. त्यांनी दिलेली माहिती ब्लॉग वरील माहितीशी जुळत होती. त्यांचा निरोप घेऊन, आम्ही आता खऱ्या गड चढाईला सुरुवात केली. मन्या आणि माल्या माझ्या पुढे होते. थोडं अंतर चढून गेल्यावर "ते बघ कसलं तरी मंदिर दिसतंय" असं म्हणत दोघे चढाईच्या रस्त्यापासून जरा बाजूला जाऊन काही तरी बघू लागले. तिथे पत्र्याचे एक छोटे देऊळ होते. आमच्या माहितीप्रमाणे मिळालेली ती पहिली खूण होती. हेच ते सतीचं देऊळ.
मग छोटासा फोटो सेशन करून आम्ही तिथून एक टप्पा वर चढून गेलो. चढताना लांब एक भगवा झेंडा दिसत होता, बहुतेक कुठलं तरी देऊळ असावं असं म्हणून आम्ही त्याच्या जवळ गेलो. तिथे शेंदूर फासलेली हनुमानाची मूर्ती दिसली. अरे वा हि तर दुसरी खूण.. आता वाट बरोबर आहे हे पक्कं झालं. मग आम्ही निःश्चिन्त झालो. आंणि तहानलेल्या घशाला शांत करण्यासाठी लगेच आमचा एक काकडी ब्रेक झालाच.
तिथून पुढं सपाटीवरून चालत चालत आम्ही गडाच्या पायथ्याच्या जवळ पोचलो. गडावर जाण्याची वाट समोरून दिसत नव्हती. म्हूणन आम्ही थोडं मागच्या दिशेने चालत गेलो. तिथे वर गेलेली वाट दिसत होती. इथून वर जाण्याचा मार्ग एकदम घसरडा होता आणि त्यात कोणी तरी गवत जाळून टाकल होतं. त्यामुळे धरायला काही आधार नव्हता. एकदम हात टेकवत अंदाज घेतघेत जमेल तसं आम्ही तो घसरडा टप्पा एकदाचा पार केला. आता इथून किल्ल्याच्या माथ्याजवळच्या दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्यां आम्हाला दिसत होत्या. जळालेल्या गवताचा फुपाटा आणि जवळ जवळ डोक्यावर आलेला सूर्य यामुळे उन्हाच्या तडाख्याने आम्ही घामाघूम झालो. पुढे परत थोडीशी चढण पार करून आम्ही एकदाचा माथा गाठलाच. अशा प्रकारे जवळपास १ ते १-१/२ तासांत चढून १२ च्या सुमारास गड माथ्यावर पोचलो होतो.
पूर्ण चढाई मधे आपला स्पीड खूप चांगला आहे असं उगीचच वाटणारा माल्या 'पटापट पाय उचला रे' असे सल्ले आम्हाला मधून मधून सुरुवातीपासून देत होता आणि स्वतःला दम भरला कि फोटोचं निमित्त काढून मधेच दम खात होता. मन्या सुरुवातीपासून पुढेच होता. मधे मधे त्याच्या जादूच्या पोटलीमधून कधी लिम्लेटची गोळी कधी ग्लुकोज चे बोल्ट निघत होते त्यामुळे जरा थकवा कमी व्हायला मदत होत होती.
माथ्यावर पोचल्यावर उन्हाचा थोडा तडका जास्तच जाणवायला लागला. गड तसा बोडकाच वाटला. जास्त सावली देणारी झाडे जवळ जवळ नसल्या सारखीच. माथ्यावर विशेष विस्तारहि नाही. आजूबाजूला काही बांधकाम दिसतय का हे पाहण्यासाठी आम्ही तिघे एकेका दिशेने निघालो. ५-७ मिनिटे झाली असतील तेवढ्यात विरुद्ध दिशेने गेलेल्या मन्याने "दादा पाण्याची टाकी आहेत वाटतं..", असा आवाज दिला. गडावर आम्हाला पाण्याची ३-४ टाकी दिसली. पहिलं टाकं पूर्ण कोरड होतं. त्याच्या आजूबाजूला बरेचसे कपडे पडलेले होते."च्यायला एवढ्या वरती फक्त कपडे टाकून द्यायला कोण कशाला येत असेल" असा प्रश्न मला पडला. मोठ्या आजारपणातून उठल्यावर गडावर येऊन अंघोळ करून कपडे सोडण्याची या भागात प्रथा आहे असे आम्हाला पुढच्या प्रवासात एकाकडून कळाले. त्याच्या पुढे गेल्यावर एकाच ठिकाणी ३ टाकी दिसली. सगळ्यात वरच्या टाकीच्या पाण्याचा वास येत होता ते पिण्या योग्य नसावं. बाकी दोन टाक्यांमध्ये पिण्या योग्य पाणी होते. टाकीच्या जवळ एक झाड दिसले . त्याझाडाखाली बसून आम्हाला जेवण करता आले असते पण मधमाश्यांचा वावर जाणवल्याने माल्यामधला सुरक्षादक्ष पोलीस जागा झाला आणि येताना त्याने हेरून ठेवलेल्या एका छोट्याच पण पुरेशी सावली असलेल्या झाडाखाली आम्ही जेवण करायला बसलो.
सकाळपासून चहा क्रीमरोलवर असल्याने भूक कडकडून लागली होती. बॅगेतून ब्रेड, काकडी, टोमॅटो, चीझ, मेयॉनीज आणि केचअप असा लवाजमा बाहेर निघाला. आपलं छुपं कौशल्य वापरून मन्याने एकदम टेस्टी चीझ सँडविच बनवलं. आणि प्रत्येकी दोन दोन सँडविच आम्ही हासडले.
त्यानंतर अजून भूक आहे असं मी म्हणल्यावर लगेच "भेळ करूकि मग.." असं म्हणत माल्याने सोबत आणलेले भाम भेळचे पाकीट उघडले. मग काय कांदा, लिंबू आणि लाल तिखट टाकून एक नंबर भेळ बनवली. सगळेजण मिटक्या मारत, भेळ खात, गप्पा मारत बसल्याबसल्या गडावरून काय दिसतंय का बघत होतो. मधेच येणारी थंड वाऱ्याची झुळूक त्या वातावरणाला चार चांद लावत होती.
जेवण झाल्यावर आम्ही १५-२० मिनिटे सावलीत निवांत पडून राहिलो. साधारण १-३० च्या वेळेस आम्ही गड उतरायला सुरुवात केली.
उतरताना घसारा बराच जाणवत होता. "टोटल सरेंडर" (म्हणजे बूड टेकवून घसरण्याची कसरत ) करण्याचे बरेच प्रसंग आले. माल्या त्यात आघाडीवर होता. गडावर चढताना शिट्ट्या वाजवत आम्हाला हाकणाऱ्या पोलिसाचं आता तरस झालं होतं. त्यामुळे "थांब रे पुढं जाऊ नको...", "ए, हात दे कि जरा " असे आवाज माझ्याकानावर सारखे पडत होते...
मग कुठे वाटेत निवांत आजूबाजूचे डोंगर बघत, एखादा फोटो सेशन करत, कुठला किल्ला दिसतोय का याची चर्चा करत आणि पाण्यासाठी ब्रेक घेत, ३.००-३.३० च्या सुमारास आम्ही गड उतरून ज्याघरापाशी गाडी लावली होती त्या ठिकाणी आलो.
अजून सूर्यास्ताला बराच वेळ होता. मला स्वतःला किल्ला करून खाली गावात मुक्काम करणे विशेष आवडत नाही. एवढ्या उंचीवर जाऊन त्या उंचीवर थांबता आलं पाहिजे, शांतता, स्थिरता, सूर्यास्त आणि सूर्योदय गडावरून अनुभवता यायला पाहिजे... म्हणून "किल्ल्यावर जर मुक्काम झालेतर बेस्ट" असं मला सारखं वाटत होतं..
खाली आल्याआल्या पहिल्यांदा पायातले बूट काढून ठेवले, बॅगा खाली ठेवल्या, "हुश्श्यSSS, आलो बाबा एकदाचं खाली" असं माझ्या कानावर आलं .. ट्रेकचा पहिलाच दिवस असल्यानं शरीर आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं.. थोडं स्ट्रेचिंग करून.. नंतर हात पाय धुऊन फ्रेश झालो. तेवढ्यात "पाण्याच्या बाटल्या भरून घेऊ" असं अपेक्षित वाक्य आमच्या कानावर आलेच... मागे वळून बघितलं तर मोहिमेवरून परत आलेल्या मावळ्यासारखा आपली आयुधे(नीकॅप, बफ, स्लीव्स, सापडलेली काठी) खाली उतरवताना माल्या दिसला... मी मनातल्या मनात म्हणालो म्हणजे हा 'नॉर्मल आहे' किल्ल्यावर मुक्कामी जाण्यासाठी कन्व्हिन्स करू शकतो... मग आम्ही त्या घराबाहेरील टाकीतून पाण्याचा रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या. थोडा वेळ त्या घरातल्या मंडळींसोबत बोलत बसलो. जवळचा खाऊ त्या चिल्लर कंपनीला दिला आणि त्या बाबांना थोडी बिदागी देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.
गाडीत बसून निघाल्यावर "किल्ल्यावर मुक्कामी जाऊ... त्यासाठी अंधाराच्या आत वर पोचायला पाहिजे" असं माझं आणि माल्याचं डिस्कशन चालू होतं. मागं मन्या मात्र बराच वेळ मिस केलेल्या आपल्या मोबाईलशी खेळण्यात गर्क होता.. मग अशी काहीबाही चर्चा करत, आजूबाजूच्या डोंगर रांगा बघत आम्ही आमची गाडी अहिवंत गडाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली... मला आता किल्ल्यावर मुक्क्माचे वेध लागले होते.. पण त्याच्या नादात पुढे आमची काय हालत होणार होती याची जाणीव आमच्या तिघांपैकी एकालाही नव्हती...
सहभागी मावळे: मालतेश कुसाळकर(माल्या), मनोज घुमटकर(मन्या) आणि राकेश जाधव
तळटीप: किल्ला म्हणजे ट्रेकर्सचा विठोबा.. त्याच्या दर्शनाला जाताना ओघाने कष्टोबा आलेच.. आमच्या वारीत पोटोबाही तितकाच महत्वाचा असतो. त्यासाठी पूर्ण तयारी आणि प्रयत्न केले जातात. त्याच बरोबर 'फोटोबाची' पण उच्चतम आराधना केली जाते. हे अनुभवायचे असेल तर एकदा एकत्र ट्रेक करून बघाच...
क्रमश...
किल्ल्याबद्दलची माहिती
पायथ्याचे गाव: दगड पिंपरी
पाण्याची सोय: किल्ल्यावर २ टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य, उन्हाळ्यात शाश्वती नाही, जाताना मार्गात पाणी नाही
मुक्कामाची सोय: गावात हनुमान मंदिरात
महत्त्वाच्या खुणा: गावातून अचला आणि बुध्याचा डोंगर यामधल्या खिंडीकडे रस्ता, खिंडीतून गड डावीकडे ठेऊन चढण, सतीचे मंदिर, हनुमानाची मूर्ती, माथ्याजवळच्या पायऱ्या, पाण्याचे टाके
जवळपासचे किल्ले/डोंगर: टवाल्या (डाव्या बाजूला),बुध्याचा डोंगर उजव्या बाजूला
पाण्याची सोय: किल्ल्यावर २ टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य, उन्हाळ्यात शाश्वती नाही, जाताना मार्गात पाणी नाही
मुक्कामाची सोय: गावात हनुमान मंदिरात
महत्त्वाच्या खुणा: गावातून अचला आणि बुध्याचा डोंगर यामधल्या खिंडीकडे रस्ता, खिंडीतून गड डावीकडे ठेऊन चढण, सतीचे मंदिर, हनुमानाची मूर्ती, माथ्याजवळच्या पायऱ्या, पाण्याचे टाके
जवळपासचे किल्ले/डोंगर: टवाल्या (डाव्या बाजूला),बुध्याचा डोंगर उजव्या बाजूला













उतरताना घसारा बराच जाणवत होता. "टोटल सरेंडर" (म्हणजे बूड टेकवून घसरण्याची कसरत ) करण्याचे बरेच प्रसंग आले. माल्या त्यात आघाडीवर होता. गडावर चढताना शिट्ट्या वाजवत आम्हाला हाकणाऱ्या पोलिसाचं आता तरस झालं होतं. त्यामुळे "थांब रे पुढं जाऊ नको...", "ए, हात दे कि जरा " असे आवाज माझ्याकानावर सारखे पडत होते.......ekch number...तुफान वर्णन
ReplyDeleteखूप छान लिहले आहे
ReplyDeleteराकेश लैच जबराट झालाय ब्लॉग .. खरा पुणेकर शोभतोस लेका .. अध्यक्षांची सामूहिक ठासनी करून मजा आणली आहे हे बाकी नक्की .. पावसाळा सरत आला की मराठवाडा किंवा बागलाण धुळे भागात जावू जरा वेगळी भटकंती करायला ..
ReplyDeleteWinStar World Casino Resort, Las Vegas - JTM Hub
ReplyDeleteThe winstar world casino resort 전라북도 출장안마 located on the Las Vegas Strip is an 안동 출장안마 iconic sight. casino resort located 논산 출장샵 in Las Vegas. 밀양 출장안마 The 경주 출장마사지 hotel and casino